पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना नोकरीत प्राधान्य

0

शिवसेनेच्या मागणीला सभागृहाची मंजुरी

मुंबई : पालिका शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांना यापुढे पालिकेच्या नोकर भरतीत प्राधान्य मिळणार आहे. याबाबत शिवसेनेचे नगरसेवक शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांच्या ठरावाच्या सूचनेला सभागृहाची मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यास मदत होणार आहे.

पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती रोखण्याकरता आणि शाळाबाह्य मुलांना शालेय शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून अनेक उपक्रम राबवले जातात. शिक्षणासाठी दरवर्षी अर्थसंकल्पात कोट्यवधी रुपयांची तरतूदही केली जाते. विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा दर्जा वाढावा, यासाठी मोफत 27 शालेय वस्तू, मुंबई पब्लिक स्कूलची सुविधा, मोफत बस सेवा, शालेय पोषण आहार, प्रोत्साहन भत्ता इत्यादी सुविधा देण्यात येतात. मात्र, तरीही विद्यार्थी गळती रोखण्यासाठी प्रशासनाला अपयश येत आहे. शिक्षणाची आवड आणि दर्जा सुधारावा, याकरता माजी विद्यार्थ्यांना ब्रँडअँबेसिडर नेमण्यात येणार आहेत. याच धर्तीवर महापालिकेच्या शाळांतून शिक्षण घेतलेल्या मुलांना पालिका सेवेत प्राधान्य देण्याबाबतचा निर्णय घ्यावा जेणेकरून पाल्यांना पालिकेच्या शाळेत दाखल करण्याचा पालकांचा कल वाढेल, अशी मागणी शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी महासभेच्या पटलावर मांडली होती. या ठरावाच्या सुचनेला सभागृहाने मंजुरी दिली आहे. आयुक्तांच्या अभिप्रायानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

मुंबईत खेळल्या जाणार्‍या विविध खेळांमध्ये एखादा खेळाडू जखमी झाल्यास त्याला आता पालिकेच्या रुग्णालयात मोफत उपचार मिळणार आहेत. याबाबत शिवसेना नगरसेवक समाधान सरवणकर यांनी मांडलेल्या ठरावाच्या सुचनेला पालिका सभागृहाने मंजुरी दिली आहे.
मुंबईत फुटबॉल, क्रिकेट, खो-खो, कबड्डी अशा विविध प्रकारच्या खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धांमध्ये खेळणारे अनेक खेळाडू हे सर्वसामान्य कुटुंबातील असतात. मात्र काही वेळा जबर मार लागल्यास त्यांना महागडे उपचार करणे शक्य नसते. त्यामुळे त्यांना आपली कारकीर्द गमावण्याचीही वेळ येते.