पुणे । महापालिकेच्या माध्यमातून शाळांना मदत केली जाईल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि इतर सुविधा देण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. महापालिकेतून काही अडचण आली, तर या प्रभागातील नगरसेवक स्वखर्चातून मदत करतील, असे आश्वासन महापालिका स्थायी समिती सदस्य मारुतीआबा तुपे यांनी दिले.
महापालिकेची साध्वी सावित्रीबाई फुले विद्यानिकेतन शाळा क्र.4 मध्ये शिष्यवृत्ती पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी माजी महापौर वैशाली बनकर, नगरसेविका उज्ज्वला जंगले, माजी नगरसेवक सुनील बनकर, सहायक प्रशासकीय अधिकारी सुरेश उचाळे, शाळा व्यवस्थापन समितीचे विकास देशमुख, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पाचवी आणि आठवीतील शिष्यवृत्तीमध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख स्वरुपात बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. पाचवीतील राणी माठे, तन्वी भावेकर, कल्याणी नंदुर्गे, वैष्णवी देशमुख, विक्रम गावडे, मयुरी गोरे, आरती आमळे तर आठवीतील पवन दुनघाव या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांना प्रोत्साहनाची गरज
महापालिकेच्या शाळांनी गुणवत्ता टिकवली आहे. पालिका शाळेतील विद्यार्थी डॉक्टर, वकील, इंजिनिअर, वकील अशा सर्वोच्च पदापर्यंत पोहोचत आहेत. पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. विद्यार्थी संख्येबरोबर गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे तुपे यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक दत्तात्रय मुळीक यांनी केले. बाळकृष्ण चोरमले यांनी सूत्रसंचालन तर वंदना जाधव यांनी आभार मानले.
शाळांची पटसंख्या वाढली
महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढत आहे. त्याचबरोबर विद्यार्थी संख्याही दरवर्षी वाढत आहे. पालकांकडून शिक्षकांना प्रोत्साहन मिळत असल्याची बाब कौतुकास्पद आहे.
– सुरेश उचाळे,
सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, पालिका