पालिका सफाई कर्मचार्‍यांना वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळेना

0

भुसावळ  । येथील नगरपालिका सफाई कर्मचार्‍यांना व उर्वरित कर्मचार्‍यांना 5व्या वेतन आयोगाच्या फरकाची थकीत रक्कम अद्यापही मिळालेली नसल्याने कर्मचार्‍यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून यासंदर्भात कामगार युनियनतर्फे नगराध्यक्षांसह मुख्याधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे.पाचवे वेतन आयोग लागू झाल्यापासून सफाई काम करणार्‍या कामगारांना आपल्या फरकाची रक्कम अदा करण्यात आलेली नाही.

मात्र काही कर्मचार्‍यांना वशिल्याने फरक अदा करण्यात आला असल्याचा आरोप युनियनने केला आहे तर न्यायालयाच्या आदेशाने सेवानिवृत्तांना तसेच इतर काही कर्मचार्‍यांना संपूर्ण वेतन फरक अदा करण्यात आले आहे. मात्र सफाई कामगारांना वेतन फरकापासून वंचित ठेवण्यात आले आहे. तरी याप्रश्‍नी नगराध्यक्षांनी लक्ष देवून उर्वरित रक्कम देण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर राजू खरारे, श्रावण टाक, आनंद टाक, द्वारकादास खरारे, अर्जुन केसला, भारत दागोर, दिपक पवार, विक्की चावरिया, कविता करकेले, भीम संगेले, सुरेश दुपटाने, अशोक फालक, राजेश पाटील, राजू चौधरी, मोहन भारंबे, सुनिल शेकोकारे, घनश्याम बेंडाळे, आत्माराम दुसाने, प्रल्हाद सपकाळे, मिलींद पाटोळे, किशोर सावकारे, फिरोज खान, संतोष तुरकेले, राजेश टाक यांसह 82 कर्मचार्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहे.