उन्हाळी हॉकी प्रशिक्षण शिबिराचा समारोप
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने थेरगाव येथे पीसीएमसी-व्हेरॉक-वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमी सुरू आहे. त्याच धर्तीवर शहरातील हॉकी खेळाडूंसाठी पालिका विक्रम पिल्ले अॅकॅडमी सुरू करणार आहे. याबाबत विक्रम पिल्ले यांच्याशी चर्चा झाली आहे, अशी माहिती सभागृह नेते एकनाथ पवार यांनी दिली.
पालिकेच्यावतीने व विक्रम पिल्ले अॅकॅडमीच्या सहकार्याने 12,14, 16 व 18 वर्षांखालील मुले व मुलींसाठी नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद पॉलिग्रास स्टेडिमय येथे उन्हाळी हॉकी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. त्यास सुमारे 250 खेळाडूंनी सहभाग घेतला. या शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ऑलिम्पिक हॉकीपटू विक्रम पिल्ले, आंतरराष्ट्रीय खेळाडू विकास पिल्ले, क्रीडा विभागाचे प्रशासन अधिकारी राजेश जगताप, क्रीडाधिकारी रज्जाक पानसरे, राष्ट्रीय हॉकी पंच श्रीधरण तंबा, खेळाडू व पालक उपस्थित होते.
अद्ययावत प्रशिक्षण देणार
पवार म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरातून राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय खेळाडू अधिकाधिक संख्येने तयार होऊन शहराचा नावलौकीक वाढावा. वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमीप्रमाणे विक्रम पिल्ले अॅकॅडमीद्वारे शहरातील हॉकीपटूंना अद्ययावत प्रशिक्षण देण्याचे पालिकेचा विचार आहे. कार्यक्रमात खेळाडूंना प्रमाणपत्र, टी-शर्ट व टोपीचे वाटप करण्यात आले. क्रीडा पर्यवेक्षक अनिता केदारी यांनी सूत्रसंचालन केले. ज्ञानेश्वर केदारी यांनी आभार मानले.