मुंबई : मुंबईतील पूर्व उपनगरातील एक चौक व 28 रस्त्यांमध्ये सुधारणा व दुरुस्ती कामे करण्याचा निर्णय पालिकेने हाती घेतला आहे. या कामांसाठी 60.75 कोटी रुपयाचे कंत्राट कंत्राटदाराला दिले आहे. पावसाळ्यानंतर दुरुस्ती कामांना सुरुवात होईल. प्रस्ताव पालिकेने स्थायी समितीच्या मंजूरीसाठी सादर केला आहे.
वाहतुकीची वर्दळ, खासगी संस्थांद्वारे सातत्याने खोदण्यात येणारे चर, जलवाहिन्यांना लागलेली गळती, पर्जन्य वाहिन्यांचे अपूर्ण जाळे, रस्त्यांची होणारी झीज, रस्त्याला पडणार्या भेगा आणि पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे यामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. उपनगरात हे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे येथील 28 रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे करण्याचा निर्णय घेतला आहे. टप्पा टप्प्याने ही कामे केली जातील. एल (कुर्ला) विभागातील 23, एम पूर्व मधील शिवाजीनगर, देवनार भागातील 4 आणि पश्चिमकडील एका चौकांचा समावेश आहे. पावसाळ्यानंतर या कामाला सुरुवात होईल. मे. देव इंजिनिअर्स या कंत्राटदाराला 60 कोटी 75 लाख, 24 हजार 296 रुपयांचे कंत्राट देण्यात येणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव प्रशासनाने समितीच्या पुढे मंजुरीकरिता ठेवला आहे. पालिकेने हमी कालावधी संपलेल्या जुन्या रस्त्यांची पाहणी केली. यात पूर्व उपनगरातील एल, एम पूर्व, एम पश्चिम, एन, एस, टी विभागातील 101 रस्त्यांचे सांधे उखडल्याचे निर्दशनात आले.