पालिकेकडून माध्यमिक विद्यालयांना के-यॉन मशिन

0

सुमारे पावणे बावीस लाख रुपये होणार खर्च

पिंपरी चिंचवड- महापालिकेच्या प्राथमिक शाळांबरोबरच अठरा माध्यमिक शाळांनाही के-यॉन मशिन पुरविण्यात येणार आहे. दोन वर्षांसाठी या मशिनची देखभाल-दुरूस्ती ठेकेदार कंपनीकडून करण्यात येईल. त्यासाठी सुमारे पावणे बावीस लाख रुपये इतका खर्च केला जाणार आहे. के-यॉन मशिन हे आयआयटी मुंबई आणि आयएल अँड एफएस एज्युकेशन यांनी बनविलेले शैक्षणिक उपकरण आहे.

उपकरणाची हाताळणी सोपी
त्यामध्ये उच्च क्षमतेचा संगणक, प्रोजेक्टर डिव्हीडी प्लेअर वा राईटर, स्पिकर, इंटरनेट कनेक्टिव्हीटी, स्पिकर्स आदी असून हाताळायला अतिशय सोपे हे उपकरण आहे. या उपकरणामुळे शाळेमध्ये अत्याधुनिक प्रशिक्षणासाठी सर्व प्रकारची उपकरणे एकाच छोट्या बॉक्समध्ये उपलब्ध होवू शकतात. यंदाच्या शैक्षणिक वर्षात महापालिकेच्या प्राथमिक शाळांसाठी के-यॉन मशिन उपलब्ध करणे आणि त्यांच्या देखभाल-दुरूस्तीसाठी ई-निविदा मागविण्यात आली होती.

के-यॉन मशिनची आवश्यकता भासणार
प्राप्त झालेल्या निविदांमध्ये सर्वात कमी दर मेसर्स ग्लोबल एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी या ठेकेदार कंपनीने सादर केला. त्यामुळे प्राथमिक शाळांसाठी आवश्यक 88 के-यॉन मशिनचे काम संबंधित कंपनीला देण्यात आले. याचप्रमाणे सध्याच्या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता आठवी आणि दहावीचा अभ्यासक्रम बदललेला आहे. त्यासाठी या के-यॉन मशिनची आवश्यकता अधिक भासणार असल्याचा दावा करत महापालिकेने खरेदी घाट घातला आहे.