पालिकेची अनधिकृत नळजोडांवर कारवाई

0

516 नळजोड तोडल्याची प्रशासनाची माहिती

पुणे : शहरातील पाणी टंचाईच्यामुळे पालिकेकडून अनधिकृत नळजोडांवर कारवाईचा बडगा उभारला आहे. गेल्या दोन महिन्यांत पाणीपुरवठा विभागाकडून सुमारे 516 नळजोड तोडण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. समान पाणी योजने अंतर्गत पालिकेकडून करून घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात 1 लाख 60 हजार नळजोड आढळून आले असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

शहराला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला धरणसाखळीत गतवर्षीच्या तुलनेत 10 ते 15 टक्केकमी पाणीसाठा आहे. त्यातच, उन्हाची तीव्रता अधिक आहे. ही बाब लक्षात घेऊन पाटबंधारे विभाग आणि महापालिकेकडून पाणी वापराचे नियोजन केले जात आहे. शहरातील अनधिकृत पाणी वापरावरही नियंत्रण आणण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून शहरातील अनधिकृत नळजोडांवर आपला कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. समान पाणी योजनेसाठी महापालिकेकडून शहरात नळजोडांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात अनधिकृत नळजोडांचा आकडा समोर आला असून महापालिका प्रशासनाच्या मते हे नळजोड सुमारे 1 लाख 60 हजार आहेत. त्यामुळे पालिकेकडून या नळजोडांवर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

जलवाहिन्यांना टॅब मारता येणार नाही

पालिकेच्या समान पाणी योजनेत शहरात 1600 किलो मीटरच्या नवीन जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. या जलवाहिन्यांवरून नव्याने नळजोड देण्यात येणार असल्याने सर्व अनधिकृत नळजोड बंद होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. या नवीन टाकण्यात येणार्‍या जलवाहिन्यांना कोणत्याही इतर यंत्रणांना टॅब मारता येणार नाही. त्यामुळे त्यावरून केवळ पालिकेची परवानगी घेऊन नळजोड घ्यावे लागणार असल्याने सर्व अनधिकृत नळजोडधारकांना पालिकेकडे अर्ज करावे लागणार आहेत.