येरवडा । येरवडा भागातील लक्ष्मीनगर परिसरात पालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्चून रुग्णालय उभारले होते. या इमारतीच्या आवारातच तळीराम दारू पिण्याचा आनंद लुटत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या इमारतीमध्ये राहणार्या अनाथ मुलांसह परिसरातील महिलांचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
येरवडा भागातील लक्ष्मीनगर, जय जवानगर आदी भागातील नागरिकांचा आरोग्याचा मुख्य समस्या सुटाव्यात या उद्देशाने पालिकेच्या वतीने 1990-95 या काळात लक्ष्मीनगर भागात अंदाजे 6 ते 7 गुंठ्यामध्ये दोन मजली इमारत उभारून या ठिकाणी रुग्णालय उभारण्यात आले होते. मात्र पालिकेच्या वतीनेच परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन येरवडा-आळंदी मार्गावर कोट्यावधी रुपये खर्च टोलेजंग स्व. राजीव गांधी हे रुग्णालय उभारण्यात आले. त्यामुळे येथील इमारती मोकळी राहिल्याने माजी नगरसेवक जॉन पॉल यांच्या प्रयत्नाने तळमजल्यावरील खोल्या ह्या अनाथ मुलांसाठी खुल्या करण्यात आल्या. तर वरच्या मजल्यावर अनेक महिला ह्या बचत गट चालविण्याचे काम करत आहे.
तळीरामांना पोलिसांचे अभय?
इमारतीच्या मागील बाजूस दुसर्या इमारतीचे कामअर्धवट अवस्थेतच असल्याने या ठिकाणी राजरोजपणे तळीराम दारू पिण्याचा आनंद लुटत आहेत. त्यामुळे या परिसरात दारूच्या बाटल्या अस्ताव्यस्त अवस्थेत पडल्याचे चित्र पाहायला मिळते. विशेष म्हणजे इमारतीलगतच लक्ष्मीनगर पोलीस चौकी असताना देखील पोलीस यावर कोणतेच ठोस उपाययोजना करत नसल्याने तळीरामांना मोकळे रान सापडले आहे. पोलिसच दारुड्यांना पाठीशी घालतात की काय अशी शंका निर्माण होत आहे.
भिंतींना तडे
तळीरामांच्या दहशतीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. इमारतीच्या खिडक्यांना काचा नसल्याने दारुडे आतमध्ये दगड मारण्याचा प्रयत्न करत असल्याने येथे राहणार्या अनाथ मुलांमध्ये देखील भीतीचे वातावरण पसरले आहे. इमारतीचे बांधकाम हे जुने झाल्याने तेथील अनेक भिंतींना तडा जाऊन त्यावर झाडे उगविल्याने इमारत धोकादायक स्वरूपाची बनली आहे. तर सांडपाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेज लाईन नसल्याने परिसरात पाणी साचत असल्यामुळे डासांच्या प्रमाणात वाढ होऊन मुलांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न बनला आहे.
गुटख्याच्या पिचकार्यांनी रंगल्या भिंती
इमारतीच्या आवारात घाणीचे साम्राज्य पसरल्याने या भागात येणार्या नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तर गुटख्याच्या पिचकार्यांनी भिंती रंगलेल्या दिसून येतात. विशेष म्हणजे अनेक वाहनचालक येथील मोकळ्या जागेचा वापर वाहन लावण्यासाठी करत असल्याने जागा पालिकेची मात्र हुकूमत स्थानिकांची अशी अवस्था या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर इमारतीला प्रवेशद्वार व रखवालदार नसल्याने आव-जावं घर तुम्हारा अशी परिस्थितीचे स्वरूप पाहायला मिळत आहे.
आश्वासने हवेत विरली
इमारतीच्या सुधारणेबाबत अनेक पक्षातील राजकीय नेत्यांनी जनतेला दिलेली आश्वासने हवेत विरली असल्याचे यावरून सिद्ध होत आहे. परिसरात वाढलेल्या घाणीच्या साम्राज्यातून व दारुड्यांच्या दहशतीतून परिसरातील महिला व अनाथ मुलांची सुटका होणार का? याचे उत्तर मात्र अनुत्तरीतच राहिले असल्याचे परिसरात झालेल्या दुरवस्थेतून समोर येत आहे. यासंदर्भात नगरसेवक संजय भोसले, अविनाश साळवे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकाला नाही.
कारवाई करू
या ठिकाणी तळीराम दारू पिऊन दहशत पसरवीत असतील व पोलीस कर्मचारी यावर कारवाई करत नसतील तर अशा तळीरामांवर व दोषी पोलीस कर्मचारी यांच्यावर कारवाई करू
– मुकूंद महाजन, पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशन