पालिकेची बंद मैदाने तातडीने सुरू करा

0

आमदार जगताप यांच्या प्रशासनाला सूचना

पिंपरी-चिंचवड : महापालिकेची मैदाने बंद असल्यामुळे खेळाडूंची गैरसोय होत आहे. ही मैदाने सुरु करावीत, अशा सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच शहराचे नावलौकिक वाढविणार्‍या खेळाडूंना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासोबत पालिकेचे क्रीडा धोरण निश्‍चित करण्यासाठी पालिका प्रशासनाने ठोस कारवाई करण्याची सूचना देखील त्यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे.

क्रीडा धोरण निश्‍चित करावे
निवेदनात म्हटले आहे की, शहरातील अनेक खेळाडू बॅडमिंटन खेळासाठी बॅडमिंटन हॉलची मागणी करत असून उपलब्ध हॉल कमी पडत असल्याने खेळाडूंची अडचण होत आहे. महापालिकेच्या स्व:मालकीचे असलेले थेरगाव येथील बॅडमिंटन हॉल व पिंपरीगावातील काशिबाई शिंदे बॅडमिंटन हॉल बंद अवस्थेत असून, गोडावून म्हणून त्याचा वापर होत असल्याचे समजते. शहरातील खेळाडूंच्या असलेल्या मागणीचा विचार करता त्यांच्या सोयीकरता सदर हॉल सुरू करणे गरजेचे आहे. आजची नवीन पिढी टीव्ही, मोबाइल आणि कॉम्प्युटरमध्येच अडकून पडली आहे. प्रत्यक्षात मात्र मुलांना खेळण्यासाठी मैदाने नसल्यामुळे खेळायचे कुठे, असा प्रश्‍न त्यांना पडतो.

सर्वच मैदानांची दुरवस्था
पालिका प्रशासनाने सर्व खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा धोरण निश्‍चित करावे आणि खेळाडूंना सरावासाठी मैदाने उपलब्ध करावीत. अनेक प्रशिक्षक खेळाडूंना प्रशिक्षण देत असले, तरी या मैदानावर सरावासाठी लागणारी माती, मैदानावर पडलेले खड्डे बुजविणे, या गोष्टींकडे पालिका प्रशासनाकडून लक्ष दिले पाहिजे. कार्यक्रमाच्या दरम्यान या मैदानावर खोदल्या जाणार्‍या खड्ड्यांमुळे मैदानाची दुरवस्था होते. मात्र पालिका प्रशासनाकडून कोणतेही सहकार्य मिळत नसल्याची खेळाडूंची तक्रार आहे. त्यामुळे यापुढे पालिकेने खेळाडूंना सर्व सुविधा आणि मैदाने उपलब्ध करुन द्यावीत, असे जगताप यांनी निवेदनात म्हटले आहे.