पालिकेची बांधकाम मजूर नोंदणी मोहीम

0

पुणे । महापालिका हद्दीमधील बांधकाम मजुरांना कामगार कल्याण महामंडळाच्या सुविधाचा लाभ मिळवून देण्यासाठी पालिका डिसेंबर महिन्यात बांधकाम मजूर नोंदणी मोहीम राबविणार आहे. त्यासाठी बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांच्या माध्यमातून बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणावरील कामगारांची नोंदणी केली जाणार आहे.क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून बांधकाम नाक्यावरील मजुरांची नोंदणी केली जाणार आहे. तसेच महापालिकेच्या भवन, पथ, पाणी पुरवठा, मल:निस्सारण व घनकचरा विभागातील ठेकेदाराकडूनही एका वर्षात 90 दिवसांपेक्षा जास्त काम केलेल्या कामगारांची नोंदणी करून त्यांना नोंदणी प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

90 दिवसापेक्षा अधिक दिवस बांधकाम मजूर म्हणून काम केलेल्या कामगारांना आरोग्य, विमा, जीवन विमा, वैद्यकीय सुविधा, त्यांच्या मुलासाठी शिक्षणाची सुविधा अशा सुविधाचा लाभ दिला जातो. मात्र, त्यांची नोंदणी होत नसल्याने तसेच त्यामध्ये याबाबत जनजागृती नसल्याने या मंडळाच्या सुविधाचा लाभ या कामगारांना मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेकडून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या वर्षी महापालिकेकडून पाहिल्यांदाच कामगार नाक्यावर जाऊन नोंदणी केली जाणार आहे. तसेच नोंदणी प्रमाणपत्राचेही नूतनीकरण करून दिले जाणार आहे. ही मोहीम सुरू असताना, नवीन बांधकामाची परवानगी देण्यापूर्वी तसेच चालू बांधकामासंदर्भात पूर्णत्वाचा दाखला देण्यापूर्वी कामगार मंडळाकडे कामगार नोंदणी झाली आहे का, याची खातरजमा केल्यानंतरच परवानगी द्यावी, असे नमूद केले आहे. तसेच या परवानगीसोबतच कामगारांची यादी जोडण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.