पुणे । मागील महिन्यात हडपसर येथील सह्याद्री हॉस्पीटल मधील एका होमिऑपॅथी डॉ. मनिषा सोमुसे यांचा डेंग्युने मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर पालिकेने शहरातील खाजगी व सार्वजनिक दवाखान्याची पाहणी सुरू केली. दरम्यान पालिकेच्या आरोग्य विभागाला 33 महापालिकेच्या दवाखान्यात डेंग्यू सदृष्य डासांची उत्पत्ती स्थळे आढळली आहेत. त्यामुळे पालिकेने शासकीय दवाखान्यातील डॉक्टरांना व कर्मचार्यांना दवाखान्याच्या आवारात स्वच्छता राखण्याचे व कोठेही पाणी साठणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत.
किटक शास्त्रीय सर्वेक्षण
शासकीय दवाखान्यात केलेल्या किटक शास्त्रीय सर्वेक्षणात 33 दवाखान्यांमध्ये एडीस इजिप्ती डास व अंडी आढळून आली आहेत. या दवाखान्यात प्लास्टीक डब्बा, सिमेंट टाकी, फ्रीज, भंगार, कुलर, बॅरेल, ड्रमचे झाकण, प्लास्टीक कागद, बादली या ठिकाणी सर्वाधिक डास उत्पत्तीची स्थळे आढळली असल्याचे पालिकेने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट
झाले आहे.
पावसामुळे जागोजागी पाण्याची डबकी साचतात. त्यामुळे डेंग्यू, चिकुनगुनीया हे आजार फैलावणार्या डासांच्या उत्पत्तीमध्ये वाढ झाली आहे. पालिकेने 19 जूनपासून डेंग्यूसदृष्य स्थळे शोधण्याची मोहीम सुरू केली. सावर्जनिक व खाजगी ठिकाणी असलेली डास उत्पत्ती स्थळे उद्धवस्त करण्यात येत आहेत. बुधवारी शहरात 16 डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत 137 रुग्ण सापडले आहेत. तर चिकनगुनियाचे 134 रुग्ण आढळले आहेत. डेंग्यू व चिकनगुनियाचा वाढता फैलाव लक्षात घेता पालिकेने नागरीकांना काळजी घेण्याचे व स्वच्छता राखण्याचे आवाहन केले आहे.
1 लाखाचा दंड वसूल
महापालिकेने 19 जूनपासून सर्वाधिक डास उत्पत्तीची स्थळे आढळणार्या खाजगी व सार्वजनिक ठिकाणी केलेल्या कारवाईत 1लाख 73 हजार 540 दंड वसूल केला आहे. 4 हजार 703 नागरीकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
आम्ही केलेल्या सर्वेक्षणात पुणे महानगर पालिकेच्या 30 पेक्षा जास्त दवाखान्यात डेंग्यूचा आजार पसरविणार्या डासांची उत्पत्ती स्थळे आढळून आली आहेत. डासांची स्थळे नष्ट करण्यात आली असून डॉक्टरांना व कर्मचार्यांना स्वच्छता राखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
– डॉ. कल्पना बळीवंत
सहाय्यक आरोग्य अधिकारी, पालिका