पालिकेचे उद्यान तळीरामांचा अड्डा!

0

येरवडा । पालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून नागपूरचाळ-शांतीनगर प्रभागात पाम उद्यानाची उभारणी करण्यात आली आहे. सध्या मात्र हे उद्यान तळीरामांचा अड्डा बनल्याने परिसरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. शांतीनगर-इंदिरानगर भागात पालिकेच्या वतीने या भागातील नागरिकांच्या सुविधासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून अंदाजे 7 ते साडेसात एकरमध्ये पाम उद्यानाची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी प्रवेशद्वारावर आजपर्यंत पालिकेच्या वतीने रखवालदार नेमण्यात न आल्याने या भागातील तळीरामांसाठी उद्यानही दारू पिण्यासाठी हक्काची जागा बनली आहे. रखवालदारांना बसण्यासाठी उभारण्यात येणार्‍या खोल्यांचे काम हे अर्धवट अवस्थेत असल्याने येथील खोल्यांच्या भिंती ह्या गुटख्यांच्या पिचकार्‍यांनी रंगल्या आहेत. त्यातच भिंतीवर अश्‍लील चित्रे काढल्याने हे खरोखरच पालिकेचे उद्यान आहे का? हा प्रश्‍न उपस्थित राहत आहे. कारण सकाळ-संध्याकाळ उद्यानात ज्येष्ठ नागरिकांसह महिलाही येत असतात. त्यामुळे भिंतीवरील अश्‍लील चित्रांमुळे नागरिक हैराण झाले आहे.

हाकेच्या अंतरावरच पोलिस स्टेशन
येथील मोकळ्या जागेचा गैरवापर हे दारूडे करत असल्यामुळे उद्यानात असलेल्या दारूच्या बाटल्या परिसरात अस्ताव्यस्त पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हाकेच्या अंतरावरच उद्यानासमोर विश्रांतवाडी पोलिस स्टेशन असताना देखील पोलिसांकडून अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारे कारवाई झालेली नाही. अनेक ठिकाणी गट्टू उखडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नागरिकांसाठी उद्यानात बसण्याची व्यवस्था करण्यात आली असली तरी पण मोकाट जनावरेच याचा वापर करत असल्याने बैठकव्यवस्था कोणासाठी? अशा प्रश्‍न उपस्थित होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील तळ्यात पाणी साचत असल्याने त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेवाळ साचल्याने डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न
उद्यानात जर सर्रासपणे दारूडे दारू पिण्याचा आनंद लुटत असतील व यावर पोलिस यंत्रणा काहीच उपाययोजना करत नसतील तर तळीरामांना पोलिसांचा वरदहस्त लाभत आहे की काय?असा प्रश्‍न पडत असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.

कचर्‍याचे ढीग, स्वच्छतागृहांची दुरवस्था
स्वच्छतागृहांची दुरवस्था झाल्याने त्यासाठी अनेक जण उद्यानातील जागेचा वापर करत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. कचरादेखील उघड्यावरच टाकण्यात येत असल्याने परिसरात जागोजागी कचर्‍याचे ढीग साचले आहेत. तरी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उद्यानाची डागडुजी करण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात पालिकेचे उद्यान विभागाचे अधिकारी अशोक घोरपडे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे व नगरसेविका शीतल सावंत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

सर्वसामान्य जनतेवर अन्याय
अगोदरच शहरासह उपनगर भागात महिला व तरुणींच्या छेडछाडीच्या घटनेत वाढ होत असताना जर पालिकेचे उद्यानाचा गैरवापर दारूडे हे दारू पिण्यासाठी करत असतील तर राजकीय नेत्यांसह पोलीस देखील सर्वसामान्य जनतेवर अन्याय करत आहेत. या दारूड्यांवर कठोर कारवाईची गरज आहे.
– अशोक तनपुरे, जिल्हाध्यक्ष,
आरपीआय प्रेसिडियम मराठा आघाडी