पुणे । पुणे महापालिकेच्या विविध विभागांमध्ये हंगामी स्वरुपामध्ये सुरक्षारक्षक पुरविले जातात. गेल्या तीन महिन्यांपूर्वी सुरक्षारक्षक पुरविण्याच्या निविदेची मुदत संपुष्टात आली आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून हे सुरक्षारक्षक वेतनापासून वंचित आहेत. त्यांचे पगार करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिल्यानंतर देखील अद्याप त्यांचे वेतन देण्यात आले नाही.
तीन महिन्यांचे वेतन रखडले
सुरक्षारक्षक पुरविण्याच्या निविदेची मुदत संपुष्टात आलेली आहे. तरीदेखील त्या सुरक्षारक्षकांकडून काम करून घेतले जात आहे. ते सुरक्षारक्षक अखंडितपणे सेवा पुरवित आहेत. असे असूनही त्यांना गेल्या तीन महिन्यांचे वेतनही मिळालेले नाही. सुमारे हजारभर सुरक्षारक्षकांना महापालिकेने गेल्या तीन महिन्यांचे वेतन दिलेले नाही. अंदाजपत्रकात सुरक्षारक्षकांच्या वेतनासाठी दरवर्षी 34 कोटी रुपयांची तरतूद असते. यावर्षींच्या अंदाजपत्रकात ती फक्त 14 कोटी रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षारक्षकांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रशासन पेचात
प्रशासनाने तर काही सुरक्षारक्षकांची सेवाच खंडित केली असून काम पण नाही व वेतनही नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे. महापालिका कंत्राटी कामगार संघटनेच्या माध्यमातून या प्रश्नावर आंदोलन करण्यात आले. त्यांनी आयुक्तांची भेट घेऊन या प्रश्नात लक्ष घालण्याची मागणी केली होती. महापौर मुक्ता टिळक तसेच स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्याशीही त्यांनी चर्चा केली होती. त्यामुळे आयुक्त कुणालकुमार यांनी प्रशासनाला सर्व सुरक्षारक्षकांचे थकीत वेतन त्वरित अदा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, वेतन द्यायचे तर कशातून द्यायचे, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. त्यामुळे अद्याप वेतन रखडले आहे.