पालिकेचे 34 गाळे वापराविना

0

फैजपूर। येथील पालिका संचलित म्युनिसिपल हायस्कूलच्या मागील भागात क्रीडा संकुलाच्या बैठक व्यवस्थेला लागून चार वर्षांपूर्वी 34 गाळ्यांचे बांधकाम झाले होते. भुसावळ रोडवरील अतिक्रमित दुकानदारांना हे गाळे देणे नियोजित आहे. मात्र, पालिका आणि व्यावसायीकांमध्ये समन्वय होत नसल्याने पडून असलेल्या लाखो रुपयांच्या गाळ्याच्या अशरक्ष: शौचविधीसाठी उपयोग होत आहे. दुसरीकडे पालिका पुन्हा 20 गाळे बांधण्याच्या तयारीत आहे.

शहरात म्युनिसिपल हायस्कूलच्या मागील बाजूस असलेल्या प्रांगणावर एकात्मिक विकास योजनेतून लोकसेवक मधुकरराव चौधरी क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात आली होती. या वेळी वाहतूक आणि रस्ता रुंदीकरणात अडथळा नको म्हणून भुसावळ रोडवरील अतिक्रमित दुकानदारांसाठी क्रीडा संकुलाच्या बैठक व्यवस्थेला लागून 34 गाळे बांधण्यात आले. हे गाळे वाटपाबाबत तीन वर्षात अनेक प्रयत्न झाले. मात्र, उपयोग झाला नाही. तद्नंतर लिलाव निघाला. मात्र, भुसावळ रोडवरील दुकानदारांसाठी ही लिलाव प्रक्रिया स्थगित झाली.

लाखो रुपयांची ही मालमत्ता धूळ खात पडून
करारनामा आणि वार्षिक भाड्यावर पालिका व्यावसायीकांचे एकमत झाल्याने लाखो रुपयांची ही मालमत्ता धूळ खात पडून आहे. पालिकेने बांधलेल्या या गाळ्यांसाठी नगररचना विभागाने ठरवून दिलेले नियम अटीशर्तीनुसार अनामत भरणे संबंधित व्यावसायिकांना मान्य नाही. म्हणूनच ही दुकाने स्थलांतरित होण्याचा विषय रेंगाळला आहे. त्यात सर्वमान्य तोडगा निघणे अपेक्षित आहे. आधीच 34 गाळ्यांमध्ये दुकानदारांच्या स्थलांतराचा प्रश्न सुटलेला नाही. दुसरीकडे या संकुलाच्या दक्षिणेकडील कंपाउंडला लागून पालिका आणखी 20 गाळे बांधणार आहे.

पुढार्‍यांनी लक्ष द्यावे
याठिकाणी गाळे बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया करण्यात आली आहे. भुसावळ रोडवरील 34 अतिक्रमित दुकानदार आणि पालिका प्रशासनात समेट झाल्यास हा तिढा सुटेल. यानंतर याठिकाणी असलेले दुकानदार नवीन गाळ्यांमध्ये स्थलांतरित होऊन भुसावळ रोड मोकळा श्वास घेऊ शकतो.

शिवाय येथील अतिक्रमण काढण्यात पालिका प्रशासनाला यश मिळाल्यास याठिकाणी असलेली दुकाने निघून रस्ता रुंदीकरण होईल. यामुळे वाहतुकीस उद्भवणारा अडथळा दूर होऊन रहदारीची समस्या नेहमीसाठी दूर होईल. मात्र, पुढार्‍यांच्या उदासिन धोरणामुळे त्यासाठी पुढाकार घेणार कोण? हा कळीचा मुद्दा आहे.

घाणीचे साम्राज्य निर्माण
शहरातील बेरोजगार तरुणांना आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी दारोदार हिडणे पडू नये त्यांना गावातल्या गावात रोजगार मिळावा यासाठी पालिकेमार्फत शहरात म्युनिसिपल हायस्कूलच्या मागील भागात क्रीडा संकुलाच्या बैठक व्यवस्थेला लागून चार वर्षांपूर्वी 34 गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र अद्यापही या गाळ्यांचे योग्य व्यक्तींना वाटप करण्यात आलेले नसल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे शासनाचा निधी वायफळ जात असल्याचे दिसून येते.