पालिकेच्या अंदाजपत्रकात 1700 कोटींची तूट

0

पुणे । महापालिकेच्या बांधकाम आणि मिळकत कर विभागाच्या उत्पन्नात घट झाल्याने पालिकेच्या अंदाजपत्रकात 1700 कोटींची तूट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काळात उत्त्पन्न वाढीवर लक्ष केंद्रीत करण्याबरोबर अनावश्यक खर्चाला कात्री लावावी लागणार आहे. महापालिकेच्या 2017-18 च्या अंदाजपत्रकात गृहीत धरलेल्या उत्पन्नापेक्षा तब्बल 1700 कोटींची अंदाजपत्रकीय तूट येणार आहे. 50 टक्के विकासकामांना कात्री लावण्याचे आदेश महापालिका आयुक्त कुणाल यांनी दिले होते. मात्र, या आदेशाला स्थगिती देत; ज्या कामांना कात्री लावायची आहे, त्याचा अहवाल स्थायी समितीमध्ये सादर करावा त्यानंतर समिती ठरवेल त्या कामांना कात्री लावण्यात यावी, अशा सूचना स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्यासह समिती सदस्यांनी बुधवारी प्रशासनास केल्या.

मागील महिन्यात महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी पालिकेच्या अंदाजपत्रकाचा आढावा घेतल्यानंतर स्थायी समिती अध्यक्षांनी आज आढावा बैठक बोलाविली होती. या बैठकीत या सूचना देण्यात आल्याचे मोहोळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या वर्षीचे अंदाजपत्रक सुमारे 5 हजार 912 कोटी रुपयांचे असून प्रत्यक्षात महापालिकेस 4 हजार 200 कोटींचे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे या वर्षी 1700 कोटींची अंदाजपत्रकीय तूट येणार असल्यावर प्रशासनाकडून शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे मोहोळ यांनी सांगितले.

महापालिकेच्या अंदाजपत्रकास 7 महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप विकासकामांना सुरूवात झालेली नसल्याची ओरड सत्ताधारी भाजपसह सर्वपक्षीय नगरसेवकांकडून करण्यात येत आहे. मे महिन्यात मंजूर झालेले अंदाजपत्रक, त्यानंतर जुलै महिन्यात लागू झालेला जीएसटी यामुळे विकासकामांच्या फेरनिविदा काढल्या असून अवघ्या 10 टक्के कामांच्या वर्कऑर्डर देण्यात आल्या आहेत. अशा स्थितीत पालिकेने 1100 कोटींचे उत्पन्न गृहीत धरलेल्या बांधकाम विभागास ऑक्टोबर 2017 अखेर केवळ 270 कोटींचे उत्पन्न मिळालेले आहे.