भुसावळ : भुसावळ आणि पाणीटंचाई हे समीकरण 1882 पासून मी अनुभवत आहोत मात्र घोषणा करण्याऐवजी प्रत्यक्षात योजनेची अंमलबजावणी करणार्या आमदार संजय सावकारे यांचे कौतुक करावे तेवढे थोडे असून अटल योजनेमुळे शहराचा पाणीप्रश्न सुटणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी योजनेच्या भूमिपूजनप्रसंगी सांगितले. ते म्हणाले की, पालिकेने आता उत्पन्न वाढीसाठी सोलर प्रोजेक्टद्वारे निर्मित झालेल्या विजेची वीज कंपनीला विक्री करावी तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी शेतीला विकावे वा मैला-मिश्रीत पाणी शेतीला खत म्हणून विकता येईल. त्यातून पलिकेला उत्पन्नही मिळेल. कोल्हापूर येथे कचर्यावर अशाच पध्दतीने प्रयोग राबवण्यात आल्याने कांडीकोळसा तयार करून तो विकला जात असल्याचे व कोल्हापूर पॅटर्न सक्सेस झाल्याचा दावा त्यांनी केला.
कचरा आता लायबिलीटी नव्हे तर ‘अॅसेट’
कोल्हापूर येथे दोन प्रभागात कचरा संकलनासाठी सहा हजार रुपये महिन्याने महिला कामावर लावण्यात आल्या असून ओला व सुका कचरा त्या गोळा करत आहेत. ओल्या कचर्याद्वारे खतनिर्मिती तर कोरड्या कचर्याद्वारे कांडीकोळसा तयार करून तो विकला जात असल्याने कचरा आता लायबिलीटी नव्हे तर अॅसेट ठरत असल्याचे पालकमंत्री म्हणाले. शहरातील रिंगरोडचा प्रश्न मार्गी लावण्यासह रेल्वे भुयारी मार्गाचा प्रश्नही मार्गी लावण्याची ग्वाही त्यांनी दिली. अटल योजनेचे वार्षिक बिल एक कोटी रुपये येणार असल्याने पालिकेने पुन्हा निधीची मागणी करण्याऐवजी पालिकेने पर्यायी उत्पन्नाचे स्त्रोत शोधावेत, असे सांगत रिकाम्या जागेवर सोलर प्रोजेक्ट सुरू केल्यास त्यातून वीजनिर्मिती होईल व ही वीज विकता येईल किंवा पथदिवे सुरू करण्यासाठी वापरता येईल, असे त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या धोरणावर टिका करत जळगाव जिल्ह्यात दोन लाख शेतकर्यांना कर्जमाफी दिल्याचे त्यांनी सांगितले.
नगरसेवक ‘सयाजीराव’ नको
पालिकांमध्ये नगरसेवक सयाजीराव नको, असे पालकमंत्री म्हणताच हास्याची लकेर उमटली. आता तशी स्थिती नाही, असे सावरत ते म्हणाले की, नगरसेवक हे बुध्दिमान असल्यानंतर विकास झाल्याशिवाय राहणार नाही. यापूर्वी मुख्याधिकारी सांगतील तेथे नगरसेवक सह्या केल्या जात होत्या, असे सांगत भुसावळचे मुख्याधिकारी तसे नाहीत, अशी कोपरखळी त्यांनी मारली. मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक करतांना ते अभ्यासू असल्याचे त्यांनी सांगितले.
व्यासपीठावर या मान्यवरांची उपस्थिती
रेल्वे डीआरएम आर.के.यादव, खासदार ए.टी.नाना पाटील, आमदार गुरूमुख जगवानी, गटनेता मुन्ना तेली, फैजपूर नगराध्यक्षा महानंदा होले, सावदा नगराध्यक्ष अनिता येवले, पाणीपुरवठा सभापती किरण कोलते, भुसावळ पंचायत समितीचे सभापती सुनील महाजन, प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, तहसीलदार विशाल नाईकवडे, जैन उद्योग समुहाचे भोळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे एस.सी.निकम, राजू सुर्यवंशी, वरणगावच्या माजी नगराध्यक्ष अरुणा इंगळे, महाप्रदेश चिटणीस सुनील बढे, रजनी संजय सावकारे आदींसह पालिकेच्या विविध समिती सभापतींची व्यासपीठावर उपस्थिती होती.