पालिकेच्या उद्यानात बहरली फुले!

0

येरवडा । विमाननगर येथे नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती व्हावी. या उद्देशाने लुंकड रिअ‍ॅलिटीच्या वतीने उद्यानात फुलांचा मळा फुलविण्यात आला आहे. विमाननगर परिसरात पालिका उद्यान विभागाच्या वतीने कोट्यावधी रुपये खर्च करून तीन एकरमध्ये उद्यान उभारण्यात आले असून या ठिकाणी परिसरातील नागरिकांची वर्दळ दिसून येते.

प्रदूषणापासून मुक्तता
याबरोबरच एअरपोर्ट रोड, पुणे-नगर महामार्ग, कल्याणीनगर भागातील मार्गालगत लुंकड रिअ‍ॅलिटीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले आहे. यासंदर्भात डागलिया म्हणाले की, सध्या शहरासह उपनगरात ही वाढत्या वाहनांमुळे प्रदूषणात अधिक भर पडल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाल्याने नागरिकांना स्वच्छ हवा मिळावी व प्रदूषणापासून परिसराची मुक्तता व्हावी. या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला असून नागरिकांचे असणारे प्रश्‍न सोडविण्यासाठीच हा उपक्रम राबवत असून नागरिकांचा देखील उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असल्याने केलेल्या कामाचा आनंद मिळत आहे. यामुळे भविष्यात देखील परिसर कशा पद्धतीने प्रदूषणमुक्त होईल व नागरिकांचे समस्या सोडविण्यासाठी आपण वचनबद्ध राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपयुक्त वनस्पतींची लागवड
उद्यानाची शोभा वाढावी याकरिता दत्तात्रय निकाळजे यांनी विशेष प्रयत्न करून मोकळ्या जागेत झेंडू, तेरडा, तुळस, गवती चहा, सूर्यफूल, जास्वंदी यांची लागवड केल्याने उद्यान अधिकच सुशोभित दिसत आहे. यामुळे अनेक नागरिकांना अशा उपयुक्त वनस्पतींचा फायदा होत आहे. पथदिवे बसविण्यात आले असून त्याच्या देखभालीसाठी कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे.

पर्यावरण जनजागृती
सर्वसामान्य जनतेमध्ये वृक्षारोपणाविषयी व पर्यावरण संदर्भात जनजागृती व्हावी, या उद्देशाने लुंकडचे राहुल डागलिया यांच्या हस्ते उद्यानामध्ये सर्वांत प्रथम वृक्ष लागवड करण्यात आली. उद्यानामध्ये दररोज कर्मचारी स्वच्छतेचे काम करत असतात याबरोबरच उद्यान सुंदर दिसावे याकरिता पाण्याचा फवारा बसवण्यात आला आहे. एवढ्यावरच न थांबता पक्षांना खाण्यासाठी धान्य देखील टाकण्यात येते. तसेच नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची टाकी उभारून पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.