पालिकेच्या उष्माघात कक्षाला यंदाही ‘खो’

0
उपाययोजना अद्यापही शून्य
भुसावळ:- शहरातील तापमानाचा पारा सध्या 37 ते 39 अंशांच्या आत स्थिरावला आहे मात्र मार्चचा शेवटच्या आठवड्यात पारा चाळीशी ओलांडेल तर एप्रिल महिन्यात शहराचे तापमान 42 अंशांपेक्षा अधिक राहणार असल्याने या पार्श्वभूमीवर संत गाडगेबाबा रुग्णालयात पालिकेने उष्माघात कक्षाची उभारणी करणे अपेक्षीत आहे मात्र अद्यापही याबाबत कोणत्याही प्रकारची तजवीज करण्यात आलेली नाही. जिल्ह्यातील सर्वाधिक हॉट शहर म्हणून भुसावळ शहराचा उल्लेख केला जातो.
यासह शहरात रेल्वे, आयुध निर्माणी, दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्र असल्याने कामगारांची संख्या अधिक आहे. यासह वीटभट्टी आणि रोजंदारी कर्मचारी अधिक आहेत. यामुळे उन्हाचा फटका बसून उष्माघात होण्याचे प्रमाण अधिक असते. यामुळे पालिकेच्या रुग्णालयात उष्माघात कक्षाची अत्यावश्यक गरज भासते. गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेच्या संत गाडगेबाबा रुग्णालयात सोयी सुविधा नव्हत्या मात्र आताच्या सत्ताधार्‍यांनी काहीशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. गतवर्षी उष्माघात कक्षासाठी कुलरदेखील नव्हते मात्र गेल्या सहा महिन्यांपूर्वी कुलरची देखील खरेदी झाली. यामुळे आता उष्माघात कक्ष सुरू करण्यास कोणतेही अडथळे नाहीत मात्र पालिकेची अधिकार्‍यांच्या उदासीनतेमुळे ही सुविधा अद्यापही सुरू झालेली नाही. याबाबत पालिकेतील सत्ताधार्‍यांनी लक्ष केंद्रीत करून उष्माघात कक्ष सुरू करावा, अशी अपेक्षा शहरातील गोरगरीब मजूरांमधून व्यक्त होत आहे.