पुणे । केंद्रशासनाच्या सूचनेनुसार स्मार्ट सिटी योजनेची अंमलबजावणी पुणे स्मार्ट सिटी डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएसडीसीएल) या कंपनी अंतर्गत सुरू आहे. या कंपनीच्या कामकाजासाठी महापालिकेतील आठ कनिष्ठ अभियंत्यांची बदली करण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या कामांसाठी समन्वयक म्हणून या कर्मचार्यांची बदली करण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.
या योजनेंतर्गत पाणीपुरवठा, रस्ते, विद्युत तसेच इतर प्रकल्पांचे काम सुरू आहे. याशिवाय, कंपनीस मोठ्या प्रमाणात भूसंपादनही करावे लागणार आहे. मात्र, त्यासाठी कंपनीकडे आवश्यक मनुष्यबळ नाही. त्यामुळे या प्रकल्पांवर देखरेख ठेवण्यासाठी तसेच त्यांच्या अंमलबजावणीत सहभागी करण्यासाठी आठ अभियंत्याची मागणी करण्यात आली होती. ही बाब लक्षात घेऊन पाणीपुरवठा विभाग, उद्यान विभाग, बांधकाम विभाग तसेच भूसंपादन विभागाच्या अभियंत्याची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी महापालिकेचे दैनंदिन काम सांभाळून त्यांच्याकडे ही अतिरिक्त जबाबदारी असणार आहे.