पालिकेच्या कार्यालयाला कै. अण्णासाहेब मगर यांचे नाव द्या

0

हडपसर । स्व. खासदार अण्णासाहेब मगर यांचे कार्य पाहता त्यांचे नाव मुंढवा-हडपसर सहाय्यक आयुक्त कार्यालयास द्यावे, असा ठराव प्रभाग समितीच्या बैठकीत सर्व नगरसेवकांनी एकमुखाने मांडला. रामटेकडी येथील कचरा प्रकल्पास सर्व लोकप्रतिनिधींनी प्रखर विरोध केला असताना भाजपच्या दोन नगरसेवकांनी मात्र यावर मौन धारण केल्याने त्यांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. हडपसरच्या विकासासाठी ग्रामसभेचे आयोजन केले जाणार असल्याने येथील विकासात लोकसहभाग वाढणार आहे. हडपसर प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली सहायक आयुक्त कार्यालयात नगरसेववकांची बैठक पार पडली. या बैठकीत उपस्थित नगरसेवकांनी अनेक मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली. या बैठकीस हेमलता मगर, वैशाली बनकर, प्रमोद भानगिरे, प्राची आल्हाट, नंदाताई लोणकर, मारुती तुपे, उज्वला जंगले आदी नगरसेवक उपस्थित होते.

15 ऑगस्टला ग्रामसभा
मुंढवा-हडपसर सहायक आयुक्त कार्यालयास कै. अण्णासाहेब मगर यांचे नाव देण्यात येऊन समाविष्ट नवीन गावाच्या सोयीसाठी इमारतीच्या तिसर्‍या मजल्याचे काम पूर्ण करण्यात यावे, यासाठी मुख्य खात्याकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. जुना पालखी मार्ग रस्ता विकसित होण्यासाठी तरतूद व्हावी, परतीच्या पालखी सोहळ्यास अनेक अडचणी येत असल्याने त्यांना लाईट, कचरा व्यवस्थापन, स्वच्छतागृह, पाणी मुबलक पुरविण्यात यावेत. हडपसर हे गावठाण आहे काळाच्या ओघात गावपण हरवत चालले व येथील विकासकामात लोकसहभाग वाढावा या हेतूने 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी गांधी चौकात ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये नागरिकांकडून सूचना घेतल्या जातील व नियोजनबद्ध पध्द्तीने विकासकामे राबविण्यात येतील, असे ठरविण्यात आले.

भाजपच्या दोन नगरसेवकांचे मौन
रामटेकडी औद्योगिक वसाहत येथे पालिकेतील सत्ताधारी कचरा प्रकल्प करण्याचा घाट घालीत आहे. याला हडपसरवासीयांचा तीव्र विरोध आहे. या बैठकीत हा कचरा प्रकल्प होऊ द्यायचा नाही, असा ठराव मांडला. ठरावाच्या बाजूने सर्व नगरसेवकांनी सह्या केल्या तर भाजपचे नगरसेवक मारुती तुपे आणि उज्वला जंगले यांनी सर्व ठराव मान्य केले पण कचरा प्रकल्पावर मात्र मौन धारण केले. सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन ठराव मांडले आहेत महापालिका आयुक्त व महापौर यांच्याकडे पाठपुरावा करून येथील प्रश्‍न सोडविले जातील.
– योगेश ससाणे, अध्यक्ष, मुंढवा-हडपसर प्रभाग समिती