पालिकेच्या खुल्या नाट्यगृहांमध्ये प्रथमच संगीत सभांचे आयोजन

0

16 उद्यानांमध्ये संगीत साधक सादर करणार कला

मुंबई : शनिवारी दिनांक 19 जानेवारी रोजी महापालिकेच्या 16 उद्यानांमधील खुल्या नाट्यगृहांमध्ये किंवा खुल्या मंचावर संगीत सभांचे आयोजन करण्यात आले असून सकाळी 7 वाजता सुरू होणार्‍या व साधारणपणे 2 तास चालणार्‍या या संगीत सभांमध्ये 75 पेक्षा अधिक उदयोन्मुख संगीत साधक आपली कला सादर करणार आहेत. मुंबई ग्रीन रागा या शीर्षकांतर्गत आयोजित या संगीतकला अविष्करणात गायनासह सारंगी, बासरी, तबला, संवादिनी, सितार, सरोद, संतूर यासारख्या विविध वाद्यांचे वादन देखील असणार आहे. महापालिकेचे सहआयुक्त डॉ. किशोर क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनानुसार व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने 16 उद्यानांमध्ये आयोजित करण्यात येणारे हे कार्यक्रम पूर्णपणे निशुल्क असणार आहेत. विशेष म्हणजे महापालिकेच्या उद्यानांमध्ये या प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन पहिल्यांदाच करण्यात येत आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

उद्यानांमध्ये वर्तुळाकार किंवा अर्ध वर्तुळाकार मंच

16 उद्यानांमध्ये शनिवारी सकाळी 7 वाजता संगीत सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. महापालिकेच्या पुढाकाराने आणि टेंडर रुट्स अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्टस व बनयान ट्री या संस्थांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत असलेल्या या संगीत सभांमध्ये उदयोन्मुख कलाकारांद्वारे भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित गायन व वादन कला सादर करण्यात येणार आहे. वाद्य वादनामध्ये प्रामुख्याने सारंगी, बासरी, तबला, संवादिनी, सितार, सरोद, संतुर इत्यादी वाद्यांचा समावेश असणार आहे. या 16 ठिकाणांपैकी काही ठिकाणच्या संगीत सभांमध्ये गायनाला प्राधान्य असणार असून साथीला वाद्य वादन असणार आहे. तर काही ठिकाणी वाद्य वादनाला प्राधान्य आणि साथीला गायन असणार आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात कलाकारांना त्यांच्या कला सहजपणे सादर करता याव्यात, यासाठी काही उद्यानांमध्ये वर्तुळाकार किंवा अर्ध वर्तुळाकार मंच उपलब्ध आहेत. या ठिकाणी रसिकांना कलेचा आस्वाद घेण्यासाठी वर्तुळाकार किंवा अर्ध वर्तुळाकार आसन व्यवस्था देखील आहे. या आसन व्यवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे याठिकाणी बसण्यासाठी खुर्च्यांऐवजी बांधलेल्या वैशिष्ट्यपूर्ण पायर्‍या असून रसिकांना ऐसपैसरित्या बसता यावे, यासाठी या पायर्‍यांची रुंदी अधिक ठेवण्यात आली आहे.