पालिकेच्या गैरव्यवस्थापनात बदल करायला वेळ लागेल

0

आमदार लक्ष्मण जगताप यांचे प्रतिपादन

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत अनेक दिवसांचे गैरव्यवस्थापन आहे. सगळीकडे मिश्रण झाले आहे. त्यामध्ये बदल करण्यासाठी आम्हाला वेळ लागणार आहे. आम्ही त्यामध्ये नक्कीच सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे शहराचे कारभारी असलेले भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

हॉकर्स झोनची लवकरच अंमलबजावणी
पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत बांधकामे वाढत आहेत. विविध भागात रस्त्यांवर टपर्‍या थाटल्या आहेत. हॉकर्स झोनची अंमलबजावणी झाली नाही, असे विविध प्रश्‍न पत्रकारांनी यावेळी आमदारांना विचारले. या प्रश्‍नांना उत्तरे देताना आमदार जगताप म्हणाले की, पालिकेत खूप दिवसांचे गैरव्यवस्थापन आहे. त्यामध्ये सुधारणा करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी मनुष्यबळ, पोलीस संरक्षणाचा अडसर येत होता. त्यासाठी प्रभाग स्तरावरील अनधिकृत बांधकाम कारवाई विभागाचे आणि पालिकेतील अतिक्रमण विभागाचे केंद्रीकरण केले आहे. यामुळे अनधिकृत बांधकामावरील कारवाईला वेग येईल. क्रीडा धोरण देखील नवीन आणले जाणार आहे. हॉकर्स झोनची लवकरच अंमलबजावणी केली जाईल.

दादागिरी खपवून घेणार नाही
भाजप नगरसेवकांची दादागिरी वाढली असल्याबाबत विचारले असता जगताप म्हणाले की, कोणत्याही नगरसेवकाची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. चुकीचा प्रकार मान्य केला जाणार नाही. मग तो नगरसेवक सत्ताधारी पक्षाचा असो की विरोधी पक्षातील असो. मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या भाजप नगरसेवकाचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे त्यावर अधिक बोलणे उचित होणार नाही. परंतु, न्यायालयात ‘दूध का दूध , पानी का पानी’ लवकरच होईल.