पालिकेच्या नवीन ईमारतीत कामकाज सुरू

0

सांस्कृतिक केंद्रात गुरुवारपासून मुख्याधिकारी करणार काम

भुसावळ : पालिकेतील वित्त, सामान्य प्रशासन, वसूली, आरोग्य व अन्य विभागांची कामे गोपाळ नगरातील नवीन संकुलात सुरू करण्यात आली आहेत तर सांस्कृतिक केंद्रात लेखापालासह मुख्याधिकारी प्रत्यक्ष कामकाजास गुरुवारपासून सुरुवात करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांनी दिली. बसस्थानकाजवळील जुन्या ईमारतीतील कक्षांना चार ते पाच दिवसात कुलूप ठोकले जाणार आहे.

पालिकेची इमारत जीर्ण झाल्याने गोपाळ नगरातील सांस्कृतिक भवन आणि गोपाळनगर संकूलातील गाळ्यांमध्ये पालिकेचे कामकाज स्थलांतरीत झाले आहे. पालिकेतील वित्त विभाग, बांधकाम विभाग, सामान्य प्रशासन विभाग, आरोग्य विभाग व अन्य विभागांची कार्यालये नवीन इमारतीमध्ये सुरू झाल्याने जून्या इमारतीमधील या दालनांना कुलूप ठोकण्यात आले आहे. येत्या आठवड्याभरात सर्व विभागांसह नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी व सर्व विषय समितींच्या सभापतींचे दालन नवीन इमारतीमध्ये सुरु होणार आहेत. येत्या शनिवारपर्यंत स्थलांतरणाचे संपूर्ण शंभर टक्के काम पूर्ण केले जाईल. यानंतर पालिकेच्या जुन्या इमारतीला कुलूप ठोकण्यात येणार आहे. बुधवारपर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन होते, मात्र काही विभागांचे स्थलांतरण करण्यास विलंब झाला.