पालिकेच्या भूमि व जिंदगी विभागाकडून पार्किंगसाठी साडेचार एकर जागा हस्तांतरित

0

पीएमपीचे ‘पार्किंग’ चर्‍होली, डुडुळगावात

पीएमपीच्या मागणीबाबत महापालिकेचा निर्णय…

पिंपरी चिंचवड : महापालिकेच्या भूमि व जिंदगी विभागाने पीएमपी बस पार्किंगसाठी चर्‍होलीतील 3.50 एकर आणि डूडूळगाव जकात नाक्याची 1 एकर अशी सुमारे साडेचार एकर जागा देण्यास मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड शहराला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरविणार्‍या ‘पीएमपीएमएल’ परिवहन महामंडळाच्या आगारात बसेसला पार्किंगसाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे सर्वत्र रस्त्यावरतीच शेकडो बसेस पार्किंग कराव्या लागत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्यस्थितीत जागा उपलब्ध नाही…
पुणे महानगर परिवहन महामंडळ हे पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका या दोन्ही मनपाच्या हद्दीपासून 20 किमी क्षेत्रासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरविणारी कंपनी आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करुन प्रवाशांना ये-जा करण्यासाठी सोयी-सुविधा पुरविल्या जात आहेत. वाढत्या बस संख्येमुळे सध्यस्थितीत परिवहन महामंडळाच्या आगारात बसेस पार्किंग करण्यास जागा उपलब्ध नाही. शेकडो बसेस अनेक ठिकाणी रस्त्यावर पार्किंग कराव्या लागत आहेत. याबाबत पीएमपीकडून महापालिका आयुक्तांना पत्र देवून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्यात व वाढीव हद्दीत पीएमपी बस पार्किंगला जागा उपलब्ध करु देण्यात यावी, अशी मागणी परिवहन महामंडळाने केली होती.

30 वर्षे कालावधीसाठी हस्तांतर…
दरम्यान, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात व वाढीव हद्दीत विकास योजनेमध्ये विविध ठिकाणी परिवहन महामंडळासाठी आरक्षणे दर्शविली आहेत. त्यानूसार चर्‍होलीतील सर्व्हे नंबर 129,130 मधील 3.50 एकर आणि डुडुळगाव, जकात नाक्याची 1 एकर जागा अशा एकूण साडेचार एकर जागा पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड यांना बस गाड्या उभ्या करण्यास 30 वर्षे कालावधीसाठी हस्तांतर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्या आरक्षित असलेल्या जागेचा ताबा परिवहन महामंडळासाठी देण्यात यावा, असा आदेश भूमि व जिंदगी विभागाने कर संकलन कार्यालयास दिले आहेत.