पालिकेच्या माजी महापौरांची टोलमाफीची मागणी

0

माजी महापौरांनी केल्या विविध सूचना

पिंपरी : पिंपरी-चिंचवडकरांसाठी आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी आणले जाणार आहे. परंतु, या प्रकल्पाचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम वेगाने पुर्ण करुन मार्गी लावावे, माजी महापौरांना टोलमाफी देण्यात यावी, शहरातील विकास प्रकल्पांना माजी महापौरांचे नाव देण्यात यावे आदी मागण्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माजी महापौरांनी केली. माजी महापौरांची सोमवारी महापौर दालनात बैठक झाली. महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला माजी महापौर कविचंद भाट, आर. एस. कुमार, ज्ञानेश्‍वर लांडगे, रंगनाथ फुगे, तात्या कदम, हनुमंत भोसले, अनिता फरांदे, अपर्णा डोके यांच्यासह अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर बैठकीला उपस्थित होते.

पुणे-पिंपरी-चिंचवड मेट्रो पाहिजे
यावेळी माजी महापौरांनी अजून काही मागण्या केल्या. पुणे मेट्रोचे काम पिंपरीत शहरात वेगात सुरु आहे. परंतु, त्याचे नाव पुणे मेट्रो असल्याने नाराजी व्यक्त करत माजी महापौरांनी पुणे-पिंपरी-चिंचवड मेट्रो असे नामकरण करावे. विकास कामांचे भुमिपूजन, उद्घाटनाच्या कोनशिला खराब झाल्या आहेत. त्या बदलाव्यात. शहरातील प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावावेत. महापालिकेच्या कार्यक्रमांचे निमंत्रण द्यावे, अशा मागण्या महापौरांनी केल्या आहेत. दरम्यान, राज्यातील महापौरांची महापौर परिषदेची 16 वी बैठक नुकतीच पणजी-गोवा येथे संपन्न झाली. या बैठकीत आजी-माजी महापौरांना टोलनाक्यावर टोलमाफी मिळावी, अशी मागणी महापौर नितीन काळजे यांनी केली होती.