पालिकेच्या रुग्णालयाला समस्यांचा विळखा

0

येरवडा । पालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून परिसरात उभारण्यात आलेल्या स्व. राजीव गांधी रुग्णालय समस्यांच्या विळख्यातून सुटणार का? असा संतप्त सवाल पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या (कवाडे गट) महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आरोग्य विभाग अधिकार्‍यास घेराव केला आहे.

येरवडा भागात पालिकेच्या वतीने कोट्यावधी रुपये खर्च करून 9 ते 10 वर्षांपूर्वी पाच मजली टोलेजंग इमारत उभारून स्व. राजीव गांधी नामकरण करून तात्कालीन खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या ठिकाणी पालिकेच्या वतीने तळमजल्यावर वाहनतळ उभारण्यात आले असले तरी याचा वापर खासगी वाहनचालक करत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच रुग्णांच्या नातेवाइकांसाठी शौचालय उभारण्यात आले असले तरी त्याची साफसफाई करण्यासाठी सफाई कामगारच नसल्याने शौचालयातील सांडपाण्यामुळे ड्रेनेज लाइन पूर्णपणे तुंबलेली आहे. त्यातील सांडपाणी उघड्यावरच वाहत असल्याने नागरिकांना घाण व दुर्गंधीला सामोरे जाण्याची वेळ येत आहे.

वाहनतळ तळीरामांचा अड्डा
वाहनतळामध्ये तळीराम सर्रासपणे दारू पित असल्यामुळे हे रुग्णालय आहे की, तळीरामांचा अड्डा असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. या परिसरात दारूच्या बाटल्या अस्ताव्यस्त पडलेल्या असून हाकेच्या अंतरावरच पर्णकुटी पोलीस चौकी असताना पोलीस व आरोग्य विभागाची उदासीनता जाणवत आहे. वाहनतळातच पिण्याच्या पाण्याची टाकी असून त्यालगतच मोठ्या प्रमाणात पाण्याचे डबके साचून पाणी दूषित झाले आहे. त्यातच पहिल्या मजल्यावर महिलांसाठी प्रसूतिगृह असून तेथे शौचालय व बाथरूम बांधण्यात आले असले तरी तेथे दोन-दोन दिवस पाणीच येत नाही.

येरवडा भागात मोलमजुरी करणारी अनेक कुटुंब असून त्यांना खासगी रुग्णालायाचा खर्च परवडणारा नसल्याने पालिकेच्या वतीने कोट्यावधी रुपये खर्च करून रुग्णालय उभारण्यात आले असले तरी रुग्णालयाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रुग्णालय उभारून फायदा झालेला नाही. याद्वारे पालिका अधिकारी सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळत आहेत.
– आरती भालेराव,
शहर उपाध्यक्षा, पीपल्स रिपब्लिकन

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जरी करण्यात आली असली तरी पण याकरिता बसविण्यात आलेली मोटारच बंद असल्याने महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी पर्याय शोधावा लागत आहे. पालिकेने केलेले कोट्यवधी रुपयांचे काम वाया गेले असून पालिकेचा महसूल देखील बुडत आहे. प्रसूतीसाठी येणार्‍या महिलांसाठी लिफ्टची सोय करण्यात आली असली तरी पण ती बंद अवस्थेत असून या कामासाठी केलेला लाखो रुपयांचा खर्च काय कामाचा याबाबत नागरिकच संभ्रमात असून विजेचा लपंडाव देखील सतत सुरू असल्याने अधिकार्‍यांचे खरोखरच रुग्णालयाकडे लक्ष आहे का?असा संतप्त सवाल पक्षाच्या शहर उपाध्यक्षा आरती भालेराव यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी आरोग्य अधिकारी दीपाली मलके यांना महिलांसह घेराव घातला असता त्यांनी व्यवस्थित उत्तर न दिल्याने रुग्णालयातील रुग्णांचा सुरक्षिततेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यावेळी कविता लोंढे, मोनिका टिबेला, जया बनसोडे, वंदना साबळे, मंगल भंबे, पौर्णिमा मोहित, ज्योती भालेराव, लक्ष्मी वानखेडे, शहराध्यक्ष प्रकाश भालेराव अकील सय्यद आदी उपस्थित होते.