पुणे (नेहा सराफ) । महापालिकेच्या अनेक वसाहती सध्या एकदम मोडकळीस आल्या आहेत. त्यातील काही तर पडण्याच्या स्थितीत आहेत. या प्रश्नावर मुख्य सभेत चर्चा झाल्यावर महापालिकेने रहिवाशांना नोटीसा पाठवून घरे खाली करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे एका बाजूने महापालिका सुरक्षित झाली आहे. पण घरे खाली केल्यावर या रहिवाशांची कुठे सोय केली जाणार याबद्दल काहीही उत्तर दिले नाही. त्यामुळे हे रहिवासी महापालिकेत खेटे घालून वैतागले आहेत. कोणाचाच पायपोस कोणालाच नसल्याने उद्या घाटकोपरसारखी दुर्दैवी घटना पुण्यात घडली तर नक्की दोषी कोण याचे उत्तर शोधणे गरजेचे झाले आहे.
असुरक्षित घरे
40 ते 50 वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतींमध्ये 12 बाय 12 च्या खोलीत एक कुटुंब राहते. या लहान खोलीत दाटीवटीने राहताना लोकांना प्रचंड अडचणी येतात. पण वाढत्या शहरीकरण आणि महागाईचा विचार केल्यास मिळेल त्या स्थितीतही हे लोक राहण्यास तयार आहेत. परंतु आपण सुरक्षा म्हणून घराची कल्पना करत असताना ते घरच सुरक्षित नसेल तर जायचे कुठे, असा साधा प्रश्न इथल्या रहिवाशांच्या डोळ्यात दिसतो.
स्नानगृहांना गळती
सामायिक स्नानगृहात स्नान करण्यास गेले तर वरच्या मजल्यावरील स्नान गृहातील पाणी खाली गळत असते. त्यामुळे वरून पडणार्या पाण्याने आंघोळ होत असल्याचे एका महिलेने सांगितले. लहानमुले खाली खेळत असतील तर वरून मातीचे गोळे पडत असल्याने सतत भीतीने छातीत धडधड होते, असे एका महिलेने सांगितले.
काय सांगू, रात्री झोपही लागत नाही
गेले दोन आठवडे सारखा पाऊस सुरू आहे. त्यातच आमच्या इमारतीची खिळखिळी अवस्था! महापालिकेने नोटीसा पाठवल्या तर जायचे कुठे आणि कसे हा विचार पाठ सोडत नाही. रात्रभर पाऊस सुरू असेल तर मनात चित्र-विचित्र विचार येतात आणि झोपही लागत नाही, ही अवस्था आहे राजेंद्रनगरमध्ये महापालिकेच्या वसाहतीमध्ये राहणार्या महिलांची.
महापालिका प्रशासनाचे कागदी घोडे
महापालिका प्रशासन या बाबतीत फक्त कागदी घोडे नाचवत आहे. आयुक्तांसोबत लोकप्रतिनिधींची या संदर्भात बैठक झाल्यावर रहिवाशांना नोटीसा पाठवण्यात आल्या. त्यानुसार महापालिकेच्या चाळ विभागात रहिवासी पर्यायी पाठपुरावा करत आहेत. पण त्याहीवेळी त्यांना भेटण्यासाठी प्रशासन पुढील तारखा देते. अगदी कालही गेलेल्या कर्मचार्यांना 1 ऑगस्ट रोजी बोलवण्यात आले आहे.
…तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
याबाबत आयुक्त कुणालकुमार यांच्यासोबत बैठक झाली आहे. इथे काही दुर्घटना घडल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा लागणार आहे. या ठिकाणी पुर्नबांधणीची आवश्यकता आहे. आठ दिवसांनी पुन्हा दुसरी बैठक घेतली जाणार आहे. पण सध्याची स्थिती अत्यंत कठीण आहे.
– धीरज घाटे, स्थानिक लोकप्रतिनिधी