राज्य सरकारचा ईएसएसएल या कंपनीशी करार
पुणे : केंद्र सरकारच्या अमृत योजनेतंर्गत महापालिकेच्या पाणीपुरवठा योजना आणि मलनि:रण प्रकल्पासाठी वापरल्या जाणार्या वीज पंपाच्या वीज वापराचे ऑडीट केले जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने ईएसएसएल या कंपनीशी करार केला असून या कंपनीच्या माध्यमातून हे ऑडीट केले जाणार आहे. वीज बचत तसेच अनावश्यक विजेचा वापर टाळण्याच्या उद्देशाने हे ऑडीट केले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. महापालिकेकडून शहरात दररोज पाणीपुरवठा करणे तसेच सांडपाणी शुद्धीकरणासाठी प्रकल्प उभारलेले आहेत. या प्रकल्पांसाठी वर्षाला सुमारे 45 ते 50 कोटींचा वीज खर्च महापालिकेकडून केला जातो.
केंद्राच्या अमृत योजने अंतर्गत सौरऊर्जेला प्राधान्य देण्यासह अनावश्यक वीज वापरावर नियंत्रण आणण्यासाठी उपाय केला जाणार आहे. त्या अंतर्गत अमृत योजनेत सहभागी झालेल्या शहरांमध्ये याची अंमलबजावणी केली जाणार आहे. केंद्राच्या अमृत योजनेतून महापालिकेस समान पाणी योजनेच्या टाक्याच्या कामासाठी निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे 27 एप्रिल 2018 रोजी महापालिकेस या संस्थेने माहिती देण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, अद्यापही महापालिकेने ही माहिती दिलेली नसल्याने राज्याच्या नगरविकास विभागाने 13 मार्च रोजी पुन्हा महापालिकेस पत्र पाठविले असून या ऑडीटसाठी तातडीने माहिती उपलब्ध करून देण्याचे आदेश महापालिकेस दिले आहेत.