मुंबई – पालिका क्षेत्रात पिण्याचे / वापरायचे पाणी टँकरद्वारे वहन करण्याच्या अनुषंगाने ‘सर्वसमावेषक वॉटर टँकर धोरण मसुदा’ तयार करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी पालिकेच्या जल अभियंता खात्याला व सार्वजनिक आरोग्य खात्याला दिले आहेत त्यानुसार अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) डॉ. संजय मुखर्जी व अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन यांच्या मार्गदर्शनात प्रस्तावित धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. हा मसुदा नागरिकांच्या सूचना व प्रतिक्रियांसाठी पालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या मसुद्याबाबत नागरिकांनी त्यांच्या सूचना / प्रतिक्रिया येत्या १५ एप्रिल पर्यंत सायंकाळी ४ वाजेपर्यंत पालिकेच्या जल अभियंता यांच्याकडे पोहोचतील अशा पद्धतीने पाठवावयाच्या आहेत, अशी माहिती उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) रमेश बांबळे यांनी दिली आहे.
पालिकेद्वारे पुरवठा करण्यात येणारे पिण्याचे पाणी टँकर मध्ये भरण्याची सोय सध्या १८ ठिकाणी असून याला ‘टँकर फिलींग पॉइंट’ असे म्हटले आहे या सर्व ठिकाणी आता जलमापक बसविण्यात आले आहेत. दररोज दिवसाच्या शेवटी या जलमापकावर नोंद झालेला पाण्याचा वापर व दिवसभरात टँकर्समध्ये भरण्यात आलेले पाणी याचा ताळमेळ घालण्यात येणार आहे व यात तफावत आढळल्यास संबंधित ठिकाणावरुन वितरित झालेल्या पाण्याबाबत चौकशी करण्यात येणार आहे टँकर मध्ये पाणी भरण्याची सोय असलेल्या सर्व १८ टँकर फिलींग पॉइंट वर ‘नाईट व्हिजन सीसीटीव्ही कॅमेरा’ बसविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यामध्ये टँकरचा वाहन नोंदणी क्रमांक, आरोग्य विभागाद्वारे देण्यात आलेला व टँकरवर लिहिलेला परवाना क्रमांक आणि वाहनचालकाचा चेहरा इत्यादी बाबींचे प्राधान्याने चित्रिकरण केले जाणार आहे. व्यक्तीला किंवा संस्थेला पालिकेद्वारे पुरविण्यात येणारे पिण्याचे पाणी ‘टँकर’ मध्ये भरुन हवे असेल्यास त्यांना पालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयातील ‘सहाय्यक अभियंता, जलकामे’यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक असणार आहे. या अर्जासोबत पालिकेची जल जोडणी असल्याचा पुरावा म्हणून जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आलेल्या जल देयकाची प्रत जोडणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.
झोपडपट्टी परिसरासाठी पिण्याचे पाणी ‘वॉटर टँकर’ मध्ये भरुन हवे असल्यास त्यासाठी देखील लेखी अर्ज आवश्यक करण्यात आला आहे. हा अर्ज पालिकेची अधिकृत जलजोडणी असणा-या व्यक्तीमार्फत वा संस्थेमार्फत त्यांच्या जल देयकाच्या प्रतीसह सादर करणे आवश्यक आहे. तसेच याबाबत संबंधित क्षेत्रातील लोकप्रतिनिधींचे पत्र सोबत जोडण्याचा पर्याय देखील उपलब्ध असणार आहे कार्यक्रमांसाठी वॉटर टँकर मध्ये पिण्याच्या पाणी भरुन घेण्यासाठी अर्ज सादर करताना त्यासोबत संबंधित कार्यक्रमासाठी आवश्यक ती परवानगी प्राप्त झाल्याचा पुरावा व कार्यक्रम पत्रिका सोबत जोडणे आवश्यक असणार आहे अर्ज मंजूर झाल्यानंतर अर्जदारास महापालिकेच्या जल आकार नियमावलीनुसार जल आकार व त्यावर मलनिःसारण आकार अग्रीम स्वरुपात देणे बंधनकारक असणार आहे. तसेच पिण्याचे पाणी टँकर मध्ये भरण्याबाबत यापुढे कोणत्याही परिस्थितीत तोंडी विनंती मान्य होणार नाही.टँकरद्वारे पिण्याचे पाणी मिळण्यासाठीचा ज्यांचा अर्ज जल अभियंता खात्याद्वारे मंजूर झाला आहे, अशा अर्जदारांनी पैसे भरल्यानंतर ३ पावत्या असलेले एक कुपन तयार करण्यात येईल. ज्यापैकी पहिली पावती ही पालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयासाठी, तर दुसरी पावती ही टँकर फिलींग स्टेशनसाठी असेल तर तीसरी पावती ही अर्जदाराकडे (जलजोडणी ग्राहकाकडे) असणार आहे जलवाहिनी दुरुस्ती अथवा इतर तांत्रिक कारणामुळे एखाद्या परिसरात पाणी पुरवठा बंद ठेवल्यास त्या भागात पिण्याचे पाणी पुरविण्याच्या दृष्टीने टँकर मध्ये पाणी भरण्यासाठी जल आकार द्यावा लागणार नाही.पालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे वॉटर टँकर उपलब्ध आहे. या वॉटर टँकरद्वारे प्राधान्याने पालिकेच्या शाळा, रुग्णालये व दवाखाने यांना मोफत पाणीपुरवठा केला जातो. तसेच पालिकेच्या वॉटर टँकरद्वारे पालिकेव्यतिरिक्त आस्थापनांसाठी / अर्जदारांसाठी पाणी पुरवठा सामान्यपणे केला जात नाही.
वॉटर टँकर साठी प्रस्तावित करण्यात आलेले सार्वजनिक आरोग्य विषयक सुधारित नियम
वॉटर टँकरसाठी पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याचा परवाना घेणे बंधनकारक असते. असा परवाना यापूर्वी संबंधित टँकर पुरवठादाराच्या नावाने दिला जात असे. ज्यामुळे एकाच पुरवठादाराकडे अनेक टँकर असल्यास त्यासाठी एकच परवाना पुरेसा होता. मात्र यामुळे पाणी पुरवठा करणा-या टँकरची आरोग्य विषयक दृष्टीकोनातून तपासणी करण्यात अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन आता प्रस्तावित धोरणामध्ये प्रत्येक वॉटर टँकरसाठी त्याच्या वाहन नोंदणी क्रमांकानुसार स्वतंत्र परवाना देण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे. त्याचबरोबर या परवान्याचा क्रमांक संबंधित टँकरवर ठळकपणे दिसेल अशाप्रकारे नमूद करणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे. संबंधित पुरवठादाराचे किमान एक कार्यालय हे बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात असणे प्रस्तावित धोरणानुसार बंधनकारक असणार आहे.
पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे टँकर व पिण्याव्यतिरिक्तच्या पाण्याचा पुरवठा करणारे टँकर याचा उल्लेख संबंधित परवान्यामध्ये स्पष्टपणे करण्यात येणार आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणा-या टँकरवर मराठी व इंग्रजी भाषेमध्ये पालिकेचे पिण्याचे पाणी’ व ‘Potable Municipal Water’ असा ठळक उल्लेख टँकरच्या तीन दृश्य भागांवर निळ्या रंगातील ठळक अक्षरात करणे आवश्यक असणार आहे. यामध्ये टँकरच्या मागील बाजू, डावी बाजू व उजव्या बाजू यांचा समावेश आहे.