इंग्रजी स्पेलिंग चुकलेल्या कामगारांकडून लिहून घेणार इंडेमिट बॉण्ड
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 2700 सफाई कामगारांपैकी ज्या कामगारांच्या नावातील इंग्रजी स्पेलिंगमुळे सेवेत सामावून घेण्यास अडचणी येत आहेत, त्या कामगारांकडून क्षतिपूर्ती बंधपत्र (इंडेमिटी बाँड) घेऊन त्यांना येत्या तीन महिन्यात सेवेत सामावून घ्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील 2700 सफाई कामगारांना सेवेत घेण्यासाठी येणाऱ्या अडचणीसंदर्भात मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी वरील निर्देश दिले.
हे देखील वाचा
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कामगारांना सेवेत सामावून घेण्यात यावे. न्यायालयाच्या यादीतील नावे व सफाई कर्मचाऱ्यांच्या पडताळणीत आढळलेल्या नावातील इंग्रजी स्पेलिंगमधील चुकासंदर्भात संबंधित कर्मचाऱ्यांकडून क्षतिपूर्ती बंधपत्र (इंडेमिटी बाँड) घेण्यात यावे. तसेच ज्या कामगारांना पूर्वी नियुक्ती देऊन स्पेलिंगमधील चुकांमुळे नियुक्ती आदेश रद्द करण्यात आले आहेत, अशा कामगारांना प्राधान्याने नियुक्ती द्यावी.
यावेळी आमदार भाई गिरकर, कामगार विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता, अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल आदी उपस्थित होते. कचरा वाहतूक श्रमिक संघाचे सरचिटणीस मिलिंद रानडे यांनी यासंबंधी माहिती दिली व हा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली.