नवापूर । पालिकेची सभा व यापुढील होणार्या सर्वसाधारण सभा ह्या सीसीटीव्ही कॅमेरात व्हाव्यात याबाबतची मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार यांना देण्यात आले. यावेळी माजी आमदार शरद गावित, नवापूर न.पा.चे नगरसेवक तथा विरोधीपक्ष नेते नरेंद्र नगराळे, नगरसेवक खलील खाटिक,नगरसेविका मिनल लोहार,सविता नगराळे,रा.कॉ.चे सरचिटणीस अमृत लोहार,माजी प.स.उपसभापती सुरेश कोकणी,शेहीचे सरपंच राकेश गावित आदी उपस्थित होते.
जनहिताच्या विषयांना कात्री
नगरपालिकेच्या नगराध्यक्षा ह्या द्वेष भावनेने विरोधी गटातील नगरसेवकांचे जनहितार्थ कामांचे विषय मागील गेल्या 4-5 सर्वसाधारण सभेपासून विषयपत्रिकेवर घेत नसून प्रत्येक वेळी पुढील सभेत आपले विषय घेऊ असे आश्वासन देण्यात आले. एकही विषय विषयपत्रिकेवर घेण्यात आलेला नाही. त्यावेळी आम्ही प्रशासनाला लेखी तक्रार देऊन मागील सभेचा त्याग केला. परंतु तेव्हा ही आम्हाला तेच आश्वासन देण्यात आले. परंतु आता देखील सोमवार 23 एप्रिल रोजी होणारी सर्वसाधारण सभेत आमचे 12 पैकी 4 किरकोळ स्वरूपाचे विषय घेण्यात आले. त्यामुळे आम्ही 23 एप्रिल रोजी होणारी सर्वसाधारण सभेस स्थगिती देऊन आमचे विषय विषय पत्रिकेत समाविष्ट करण्याबाबत निवेदनात म्हटले आहे.