पालिकेच्या सभेवर विरोधकांचा बहिष्कार

0

आठ मिनिटात आटोपली अटल योजनेची सभा

भुसावळ : अटल योजने संदर्भात पालिकेची विशेष सभा शुक्रवारी अवघ्या आठ मिनिटात आटोपली तर दुसरीकडे विरोधकांनी या सभेवर बहिष्कार टाकून दिवसभर प्रांताधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक आंदोलन छेडत पालिकेच्या अतिक्रमणातील दुटप्पी धोरणावर सडकून टिका केली.

आठ मिनिटात सभा आटोपली
पालिकेच्या सभागृहात शुक्रवारी सकाळी 11.08 वाजता पीठासन अधिकारी रमण भोळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेला सुरुवात झाली. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, गटनेता मुन्ना तेली, मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर उपस्थित होते. स्वीकृत नगरसेवक प्रा.सुनील नेवे यांनी अटल योजनेच्या निविदा जैनी ईरीगेटशन सिस्टीमने 12 जादा दराने भरल्याने ही रक्कम पालिकेला परवडणारी नसल्याचे सांगत संबंधिताशी वाटाघाटी कराव्यात अथवा पुर्ननिविदा काढावी, अशी सूचना मांडली. त्यास सभागृहाने अनुमोदन केले. भाजपाचे 31 नगरसेवक तर जनआधारच्या एकमेव पूजा राजू सूर्यवंशी सत्ताधार्‍यांच्या बाजूने बसल्या होत्या.

जनआधारचा बहिष्कार, सत्ताधार्‍यांवर टिकेची झोड
पालिकेने तीन दिवस राबवलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत दुजाभाव केल्याचा आरोप करीत जनआधारच्या नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकला. गोरगरीबांचे अतिक्रमण हटवून धनदांडग्यांना अभय दिल्याच्या निषेधार्थ प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर व सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना निवेदन देण्यात आले.

मुख्याधिकार्‍यांचे दुटप्पी धोरण
मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांनी दुटप्पी धोरण राबवल्याची टीका जनआधारच्या नगरसेवकांनी पत्रकार परीषदेत करीत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. सर्वांना समान न्याय या तत्वावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.