प्रभाग नऊमधील रहिवाशांनी स्वयंस्फूर्तीने तोडले गटारीवरील ढापे व ओटे; स्वच्छ सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर वाढली जागृतता
भुसावळ– शहर स्वच्छतेसाठी पालिकेने पुढाकार घेतला असतानाच शहरातील प्रभाग क्रमांक नऊरहिवाशांनी स्वयंस्फूर्तीने आपल्या दारापुढील गटारीवर टाकलेले ढापे, ओटे तोडून रस्ते मोकळे केले. विशेष म्हणजे पालिकेने कोणतीही नोटीस बजावली नसताना या प्रभागाच्या नगरसेविका सोनी संतोष बारसे यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत रहिवाशांनी अतिक्रमण काढल्याने शहरात समाधान व्यक्त होत आहे. स्वच्छता कर्मचार्यांचा अधिवास असलेल्या रमाबाई आंबेडकर नगर, वाल्मिक नगर, अण्णाभाऊ साठे नगरातील तब्बल 358 नागरिकांनी सोमवारी स्वत: पुढाकार घेत अतिक्रमण काढून घेतले. स्वच्छ सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर नागरीकांनी उचललेले पाऊल शहरातील नागरीकांना प्रेरणादायी आहे.
स्वच्छता होण्याचा मार्ग सुकर
शहरातील प्रभाग नऊ मध्ये स्वच्छता कर्मचार्यांचा अधिवास आहे. या कर्मचार्यांकडून संपूर्ण शहरातील दैनंदिन स्वच्छता केली जाते मात्र रमाबाई आंबेडकर नगर, वाल्मिक नगर, अण्णाभाऊ साठे नगर आदी भागांमध्ये वाढलेल्या अतिक्रमणामुळे या भागातील गटारींची स्वच्छता केली जात नव्हती. अतिक्रमण इतके वाढले होते की सात फुटांचे रस्ते दोन ते तीन फुटाचे झाले होते. यामुळे नवीन रस्ते तयार करण्यासाठीही अडचणी निर्माण झाल्या होत्या. रस्ते व गटारीची कामे पूर्ण करण्यासाठी अतिक्रमणाचा अडथळा ठरत होते. यासह गटारींची स्वच्छता करणेही कठीण झाले होते. याबाबत प्रभागाचे नगरसेवक अॅड. बोधराज चौधरी व सोनी संतोष बारसे यांनी प्रभागातील नागरिकांची बैठक घेवून अतिक्रमण काढून स्वच्छतेचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत तब्बल 358 कुटूबांनी सोमवारी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतले. यामुळे आता या भागातील सार्वजनिक स्वच्छता, रस्त्यांची नव्याने निर्मिती आदी कामांना वेग येणार आहे. शहराला स्वच्छ ठेवणार्या रहिवाशांच्या भागातही स्वच्छता राहिल.