पुणे । महापालिकेच्या कामकाजासाठी आवश्यक असलेल्या कर्मचार्यांच्या भरतीसाठी पालिकेकडून तयार करण्यात आलेल्या सेवा नियमावलीत बदल केले जाणार आहेत. त्यात काही नवीन पदांच्या निर्मिती बरोबरच वर्ग-2 आणि वर्ग-3 च्या अनेक पदांसाठीची पात्रताही बदलण्याची शक्यता आहे. याशिवाय, राज्य लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीपर्यंत गेलेल्या मात्र, निवड न झालेल्या उमेदवारांना महापालिकेच्या वर्ग-1 च्या पदासाठी संधी देण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांकडून देण्यात आली.
महापालिकेकडून दोन वर्षांपूर्वी ही सेवा नियमावली तयार करण्यात आली असून राज्यशासनाने त्यास मान्यता दिलेली आहे. मात्र, त्यात महापालिकेकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या अनेक तरतुदी राज्य शासनाने वगळलेल्या आहेत.
निकषांमध्ये बदल
काही नवीन तरतुदी तसेच नवीन पदांचा समावेश केला आहे. मात्र, त्यातील काही तरतुदींची अंमलबजावणी करण्यात तसेच शैक्षणिक पात्रतांचे निकष अडचणीचे ठरत आहेत. त्यामुळे अशा निकषांमध्ये बदल करण्यासाठी तसेच काही पदांच्या जबाबदार्यांमध्ये बदल करण्यासाठी महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने नुकतीच एक बैठक घेतली. या बैठकीत या बदलांवर चर्चा करण्यात आली असून त्याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.