पालिकेच्या 14 इमारतीवर सौरउर्जा प्रणाली

0

पुणे । पुणे शहरातील वाढत्या लोकसंख्येकडून वीजेची प्रचंड मागणी व पर्यावरणपूरक दृष्टीकोन विचारत घेऊन अपारंपारीक उर्जा स्त्रोत वापरास चालना देण्यासाठी महापालिकेच्या शहरातील 14 इमारतीवर सौरउर्जा प्रणाली बसविण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनी मार्फत पूर्णपणे मोफत ही प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. यामुळे महापालिकेची दर वर्षी तब्बल 1 कोटी रुपयांची बचत होणार आहे. महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.

मुरलीधर मोहोळ यांची माहिती
याबाबत स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, शहरातील वाढते औद्यागिकरण, रोजगारासाठी स्थलांतरीत होऊन शहरात येणारी कुटुंबे, शहराच्या ऐतिहासिक व पर्यटनामुळे स्थलांतरीत लोकसंख्या दिवसेंदिवस मोठ्याप्रमाणात वाढत आहे. यामुळे वीजेची मागणीदेखील सातत्याने वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या वतीने सौरउर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी स्थायी समितीच्या वतीने या प्रस्तावाला मान्यात देण्यात आली आहे.

जनजागृती करण्यात येणार
केंद्र शासनाने सन 2011 पर्यंत देशात अपारंपारी उर्जा स्त्रोतांतून तब्बल 1 लाख 75 हजार मेगाव्हॅट वीज निर्मिती करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. शासनाच्या या चांगल्या योजनेला पांठिबा देण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरामध्ये महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या इमारतीवर रुफ टॉप सोलर पीव्ही प्रणाली बसवून जनजागृती करण्यात येणार आहे. सोलर एनर्जी कॉपॉरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनी मार्फत महापालिकेच्या विविध इमारतींवर साधारण एक मेगाव्हॅट क्षमतेपर्यंतचे ग्रीड कनेकटेड रुफ टॉप सोलर पीव्ही प्रणाली उभारण्याचे निश्‍चित केले आहे.

महापालिकेच्या 14 इमारतीवर ही सौरउर्जा प्रणाली उभारल्यास अंदाजे 824 केडब्ल्यू क्षमतेपर्यंत सोलर पीव्ही प्रणाली उभारणे शक्य होणार आहे. यामुळे महापालिकेचा वीजबिलावर होणार्‍या खर्चात वर्षांला तब्बल एक कोटी रुपयांपर्यंत बचत होणार आहे. या प्रकल्पासाठी सोलर एनर्जी कॉपॉरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनी सोबत 25 वर्षांचा करार करण्यात येणार आहे. या आहेत त्या 14 इमारती : सावरकर भवन, बालगंधर्व ऑडिटोरियम, घोलेरोड आर्ट गॅलरी, भिमसेन जोशी ऑडिटोरियम, राजीव गांधी ई-लनिंर्ग स्कुल, आण्णाभाऊ साठे, महात्मा फुले ऑडिटोरियम, यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियम, नायडु हॉस्पिटल, कमला नेहरू हॉस्पिटल, राजीव गांधी हॉस्पिटल, पुणे महानगरपालिका भवन, पर्वती जलशुध्दीकरणे केंद्र, व अन्य इमारती