‘संत ज्ञानेश्वर-संत नामदेव’ भेट समूह शिल्पाचे काम संथगतीने- विरोधकांनी व्यक्त केली नाराजी
पिंपरीः पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने आळंदी-पुणे या पालखी महामार्गावरील वडमुखवाडी येथे संत ज्ञानेश्वर महाराज-संत नामदेव महाराज भेट समुहशिल्प तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या चार वर्षांपासून कोट्यवधी रुपयांची तरतूद करुनही हे काम रेंगाळले आहे. त्यामुळे विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. तर, शिल्पाच्या कामासाठी कोट्यवधींची तरतूद करण्यात आली असून आठ महिन्यात काम पूर्ण होईल, असा दावा सत्ताधार्यांनी केला आहे. वारकरी संप्रदायाची आळंदी व देहू ही दोन्ही तिर्थक्षेत्रे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीलगत आहेत. राज्य-परराज्यातूनही या दोन्ही ठिकाणी दरवर्षी लाखो भाविक येत असतात. त्यामुळे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे मार्गक्रमण होणा-या पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी येथे काही वर्षांपूर्वी महापालिकेने संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचे समुहशिल्प तयार केले आहे. संत तुकाराम महाराजांची भक्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शक्ती एकत्रित आल्याचे या समुहातून दर्शविल्याने आता हा चौक भक्ती-शक्ती चौक या नावाने ओळखला जात आहे. याशिवाय देहू-आळंदी रस्त्यावर मोशी चौकाजवळ वारीत सहभागी झालेली वारकरी महिला व बालकाचे छोटेखानी शिल्प उभारण्यात आले आहे.
समुहशिल्पात 26 मुर्त्यांचा समावेश
आषाढीवारीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे महापालिकेच्या हद्दीतून मार्गक्रमण होते. पुण्याकडे प्रस्थान करताना मार्गातील पालखी सोहळ्यातील पहिली आरती वडमुखवाडी येथील ज्ञानेश्वर महाराज धाकट्या पादुका मंदीरात होते. त्यामुळे याठिकाणी असलेल्या विस्तीर्ण दोन एकर जागेवर महापालिकेच्यावतीने चार वर्षांपुर्वी संत ज्ञानेश्वर महाराज व संत नामदेव महाराज भेट समुहशिल्प साकारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या समुहशिल्पात एकूण 26 मुर्त्यांचा समावेश आहे. या शिल्पातील प्रत्येक मुर्तीचे वजन, उंचीची पडताळणी राज्य सरकारच्या कला संचालनालयाकडून केली जात आहे. सुरुवातीला या समुहशिल्पाकरिता सव्वा कोटींची तरतूद करण्यात आली होती. मात्र, कला संचालनालयाच्या अधिकार्यांनी जागेची पाहणी केल्यानंतर, दूर अंतरावरुन या मुर्ती दृष्टीस पडाव्यात, याकरिता यापैकी सहा मुर्तीची उंची 22 फुटांपर्यंत वाढविण्याचे सुचविले. त्यामुळे या शिल्पाचा खर्च अनेक पटींनी वाढला आहे. आता चौथर्याकरिता 1कोटी 25 लाख रुपये, मूर्त्या तयार करण्यासाठी 6 कोटी 70 लाख रुपये व इतर अशा एकूण 9 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
विरोधकांनी व्यक्त केली नाराजी
दरम्यानच्या काळात पुणे-आळंदी रस्त्यावर महापालिकेच्यावतीने बीआरटीएस मार्ग विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे हे समुहशिल्प वाय जंक्शनच्या जागेत तयार केले जाणार आहे. त्यामुळे या शिल्पाकरिता दोन एकरपैकी साठ गुंठे जागा उपलब्ध झाली आहे. त्यावर हे शिल्प साकारले जाणार आहे. त्यामध्ये मुर्त्यांबरोबरच अॅम्फी थिएटर व गार्डनचादेखील समावेश करण्यात आला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकर्यांना वारीसोबत चालताना भक्तिभावाचे वातावरण तयार व्हावे, याकरिता हे समुहशिल्प तयार करण्याचे नियोजन आहे. मात्र, दिवसेंदिवस हे काम रेंगाळत असून, या खर्चात भरमसाठ वाढ होत आहे. शिल्पाला विलंब होत असल्यामुळे विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
भाजपच्या काळात झाले दुर्लक्ष
भोसरीचे माजी आमदार विलास लांडे म्हणाले की, भक्ती-शक्ती समुहशिल्पाच्या धर्तीवर शहरात एक देखणे शिल्प उभारण्यासाठी राष्ट्रवादीच्या काळात मी स्वत: या संत ज्ञानेश्वर महाराज व संत नामदेव महाराज समुहशिल्पासाठी पुढाकार घेतला होता. तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली होती. याशिवाय या शिल्पातील सर्व मुर्त्यांकरिता राज्य सरकारच्या सर्व विभागांच्या आवश्यक परवानग्या मिळविल्या आहेत. मात्र, नागरिकांना संतांच्या विचारांची प्रेरणा देणार्या या नियोजित शिल्पाकडे भाजपच्या काळात दुर्लक्ष झाले, ही दुर्देवी बाब आहे.
समुहशिल्पामुळे शहराची वेगळी
महापौर नितीन काळजे म्हणाले की, आषाढीवारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. निगडीतील भक्ती-शक्ती समुहशिल्पाबरोबरच पुणे-आळंदी रस्त्यावरील संत ज्ञानेश्वर महाराज व संत नामदेव महाराज भेट समुहशिल्पामुळे शहराची वेगळी ओळख निर्माण होणार आहे. या समुहशिल्पाच्या कामाकरिता केवळ दोन कोटींची तरतूद होती. त्यामध्ये आम्ही वाढ केली असून काम वेगात सुरु आहे. या शिल्पातील प्रत्येक मुर्तीचे वजन, उंचीची पडताळणी राज्य सरकारच्या कला संचालनालयाकडून केली जात आहे. त्याला विलंब लागत आहे. येत्या आठ महिन्यात हे काम पूर्ण होईल.