पालिकेतील कारभार म्हणजे दादा-भाऊ दोघे मिळून खाऊ

0

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहराला कोणी वाली राहिलेला नाही. महापालिकेत केवळ ’दादा-भाऊ’ दोघे मिळून खाऊ असा कारभार सुरू आहे. या आमदारांच्या जोडगोळीला कोणी विचारणारे नाही. त्यामुळे आम्ही म्हणेल तीच पूर्व दिशा अशी त्यांची दडपशाही सुरू आहे, असा हल्लाबोल माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते अजित पवार यांनी भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्यावर केला.

* कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
काळेवाडी येथील हल्लाबोलच्या जाहीर सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरात कष्टकरी जनता आहे. शहरवासियांना आपला विकास व्हावा असे वाटते. पण शहरात बेकारी वाढते आहे. उद्योगधंदे बंद पडत आहेत. हिंजवडी आयटी पार्कमध्ये कंपन्या बंद पडत आहेत. शहरात महिला असुरक्षित आहेत. अब्रु वाचविण्यासाठी महिलेला स्वत:च्या घराच्या बाल्कनीतून उडी मारायची वेळ येते. शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. अशा परिस्थितीत शहरासाठी स्वतंत्र आयुक्तालय यायला साडेचार वर्षे लागली. आयुक्तालय आले म्हणजे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न संपला असे नाही. शहरात वाहने पेटविणे, दंगा माजविणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. राजकीय वरदहस्तामुळे पोलिस चौक्या हप्ता वसुलीचे केंद्र बनल्या आहेत. मात्र, कष्टकर्‍यांच्या या नगरीत सत्ताधारी भाजपमधील दादा-भाऊंचा दोघे मिळून खाऊ असा कारभार सुरू आहे.

* राष्ट्रवादीच्या कामांची उद्घाटने
गेल्या वर्षभरापासून कचर्‍याच्या प्रश्‍नामुळे सामान्य जनता हैराण झाली आहे. कोटीच्या कचरा वाहतुकीची निविदा रद्द करावी लागली. पवना बंद जलवाहिनी, पाणी समस्या यावर मार्ग काढण्याची यांची इच्छाशक्ती नाही. रिंगरोडवासिय उद्धस्त होत आहे. या भाजप आमदारांनी शहराचा विकास तर केला नाहीच पण राष्ट्रवादीने केलेल्या कामांची उद्घाटनेे ते करत आहेत. गेल्या साडे तीन वर्षात भाजपच्या आमदारांनी शहारासाठी कोणते काम केले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.