उचित कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रधान सचिवांना दिल्या
पिंपरी-चिंचवड : महापालिकेतील गैरव्यहाराची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गैरव्यहाराबात उचित कारवाई करण्याच्या सूचना प्रधान सचिवांना दिल्या आहेत. यामुळे पदाधिकारी आणि अधिकार्यांचे धाबे दणाणले आहेत. शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या गैरव्यवहाराबाबत मुख्यमंत्र्यांकडे दोनदा तक्रार केली होती. रस्ते विकास कामाची निविदा प्रक्रिया, मागील आठ महिन्यांत मंजुर केलेले टीडीआर वाटप, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ईड्ब्ल्यूएस योजनेतील घरबांधणी प्रकल्पांसाठी काढलेल्या निविदा प्रक्रिया याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती.
आयुक्तांच्या सहमतीने दरोड्याचा आरोप
महापालिकेच्या रस्ते विकासकामासाठी 60 टक्के जागा ताब्यात असताना आयुक्तांनी 425 कोटी रुपयांची रस्ते विकासाची कामे काढली. या कामांमध्ये ठेकेदारांनी संगनमत केल्याने सर्व कामे निविदा रकमेच्या चार ते दहा टक्के वाढीव दराने देण्यात आली आहेत. या सर्व व्यवहारात करदात्यांच्या 90 कोटी रुपयांची लूट झाली आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या सहमतीनेच भाजप नेत्यांनी महापालिका तिजोरीवर दरोडा टाकला आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेने केला होता.
‘टीडीआर’मध्ये आयुक्त, पदाधिकारी सहभागी
महापालिकेने मागील आठ महिन्यांत तब्बल 41 लाख 27 हजार चौरस फुटांचे हस्तांतरणीय विकास हक्काचे (टीडीआर) वाटप केले आहे. त्याची किंमत 5300 कोटी असून यामध्ये आयुक्त व भाजपचे पदाधिकारी यांचा सहभाग असल्याचा आरोप केला जात आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ईड्ब्ल्यूएस योजनेतील घरबांधणी प्रकल्पांसाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली होती. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आढळराव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोनवेळा केली होती.
पदाधिकार्यांचे धाबे दणाणले
या गैरव्यवहाराची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गैरव्यवहाराबात उचित कारवाई करण्याच्या सूचना प्रधान सचिवांना दिल्या आहेत. यामुळे पालिकेतील पदाधिकारी आणि अधिका-यांचे धाबे दणाणले आहेत. गैरव्यहाराची उचित कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी खासदार आढळराव यांना पत्र पाठवून कळविले आहे.