पालिकेतील समावेशाबाबत देहूवासी संभ्रमात

0

ठराव मंजूर : स्थानिकांना विश्‍वासात घेतले नसल्याची ओरड, पुढार्‍यांचा आक्षेप

देहूरोड । पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात येणार्‍या गावांमध्ये तीर्थक्षेत्र देहू-विठ्ठलनगरचा समावेश आहे. पालिकेच्या सभेत नुकताच याबाबतचा ठराव मंजूर झाला. पण यासंदर्भात पालिकेने स्थानिक ग्रामस्थांना विश्‍वासात घेतले नसल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पालिकेत समावेशाला स्थानिक गाव पुढार्‍यांचा आक्षेप आहे. तर जमिनीला सोन्याचा भाव येणार या अपेक्षेने अनेकजण पालिकेत समाविष्ट होण्यास उत्सुक आहेत. विद्यामान परिस्थितीत ग्रामपंचायतीला गावगाड्याचा डोलारा डोईजड होत असल्याने पालिकेत गेल्यास सोयी सुविधांमध्ये वाढ होईल, असा बुध्दीवादही काहींकडून केला जात आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला नावारुपाला आणणार्‍या नेत्यांमध्ये दिवंगत शालेय शिक्षणमंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांचे मोठे नाव आहे. प्रा. मोरे हे देहुचे सुपूत्र असल्यामुळे 80-90 च्या दशकात त्यांनी देहुला पालिकेत समाविष्ट करण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. पण गावाच्या विरोधामुळे ते यशस्वी होऊ शकले नाही. आता पुन्हा एकदा देहूचा महापालिकेत समावेश करण्याबाबत पालिकेने ठराव संमत केला आहे. या ठरावाला गावातील राजकीय मंडळींकडून विरोध होत आहे. तर सर्वसामन्य ग्रामस्थांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. एकंदरीतच या विषयावर संमिश्र प्रतिक्रिया मिळू लागल्या आहेत.

गावाचे झपाट्याने शहरीकरण
तिर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून देहू गावात अनेक सोयीसुविधा निर्माण झाल्या आहेत. न भूतो न भविष्यती असे प्रशस्त रस्ते गावात तयार झाले आहेत. याबरोबरच मोकळी माळराने आणि शेतजमिनींच्या ठिकाणी आता अलिशान बहुमजली इमारती उभ्या राहिल्या आहेत. गावाच्या चारही बाजुंनी गृहप्रकल्पांचा अक्षरशः वेढा पडला आहे. कधी नव्हे तो इंद्रायणीवर या दोन अडीच किलोमीटरच्या टप्प्यात जवळपास चार मोठे पूल उभे राहिले आहेत. एकंदरीतच गाव झपाट्याने शहरकरणाकडे संक्रमीत होताना दिसत आहे. 2011 च्या जनगणनेनुसार गावची लोकसंख्या 17 हजार 435 असली तरी ढोबळमनाने सध्या ती 25 हजारांच्या घरात पोहचली आहे.

नागरी सुविधा पुरविण्यात अडचणी
वाढत्या शहरीकरणामुळे ग्रामपंचायतीला सर्वदूर नागरी सुविधा पुरविणे जिकरीचे ठरू लागले आहे. पंचायतीवरील ताण पाहता गावात नगरपंचायतीची मागणी होती. 2014 मध्ये वडगाव आणि देहू ग्रामपंचायतींचा याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला. 2016 मध्ये ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती देण्यात आली होती. एवढेच नव्हे तर नगरपंचायतीचे निर्धारीत क्षेत्रही जाहीर करण्यात आले होते. पण नंतर कुठे माशी शिंकली कुणास ठाऊक, वडगाव ग्रामपंचायतीची निवडणूक तोंडावर असताना तिथे नगरपंचायत जाहीर झाली. त्याचवेळेस देहुला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत समाविष्ट करण्याची घोषणा झाली. हा केवळ योगायोग आहे का? की ठरवून केलेली विभागणी हा देखील विचार करण्याचा मुद्दा आहे.

शेतजमिनीवर आरक्षण पडणार?
गल्लीपासून दिल्लीपर्यंत असलेल्या राजकीय पक्षाच्या पिंपरी चिंचवडमधील काही बड्या नेत्यांचे शेतकर्‍यांच्या जमिनींवर असलेले प्रेम, हे या मागील महत्त्वाचे कारण असल्याची चर्चा उघडपणे सुरू आहे. गाव पुढार्‍यांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न असल्यामुळे राजकीय मंडळींकडून या निर्णयाला विरोध कायम आहे. गावाचा पालिकेत समावेश झाल्यास सुविधा मिळतील, असे मानणारा एक गट आहे. तर या समावेशानंतर मिळकत भरताना नाकी नऊ येतील, गावाचे गावपण संपून जाईल, अनेक निर्बंध येतील, शेतजमिनींवर आरक्षणे पडतील, अशी भीती व्यक्त करणाराही वर्ग आहे. एकंदर ग्रामस्थांची संभ्रमीत अवस्था आहे.

विरोध दर्शविण्यासाठी विशेष ग्रामसभा
पिंपरी चिंचवड महापालिकेत समावेशाबाबत देहु ग्रामस्थांमध्ये संभ्रम आहे. असे असताना गावात विशेष ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांची मते घेण्याचा प्रयत्न होत आहे. यासंदर्भात ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसुरकर यांच्याशी संपर्क साधला असता, गुरुवारपर्यंत या विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.