पालिकेत उदंड सल्लागार, आता आयुक्तांनाही नेमा

0

विरोधी पक्षनेत्याची उपरोधिक मागणी
पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या विविध छोट्या मोठ्या विकासकामांसाठी खासगी सल्लागार नेमले जात आहेत. पेव्हिंग ब्लॉक बसविण्यासह स्मशानभूमीचे कामासाठीही सल्लागार नियुक्त केले जात आहेत. त्यामुळे आता पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनाही खासगी सल्लागार नेमावा, असा उपरोधिक टीका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली. तसेच प्रत्येक कामाला सल्लागार नेमल्यामुळे अभित्यांचे काय काम आहे, असेही ते म्हणाले.

सल्लागारांवर किती खर्च
महापालिकेत सन 2017-18 ते आतापर्यंत कोणकोणत्या कामासाठी खासगी सल्लागार नेमले गेले. त्यावर किती खर्च करण्यात आला. याची माहिती साने यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे गेल्या महिन्यात 26 तारखेस मागितली होती. मात्र, महिना उलटत आला तरी, अद्याप ही माहिती दिली गेली नाही.

पेव्हिंग ब्लॉकसाठी…
साने म्हणाले, पालिकेत असंख्य अभियंते आहेत. त्यांना भरमसाट वेतन दिले जाते. त्यांच्याकडून विविध विकाकामांचे काम करवून घेण्यापेक्षा सरसकट सर्वच कामांसाठी खासगी सल्लागार नेमण्याचा प्रशासनाने सपाटा लावला आहे. त्यामुळे पालिकेचे अभियंते त्या कामासाठी लायक नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पिंपळे गुरव परिसरात रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉक लावण्यासाठी खासगी सल्लागार नियुक्तीस मागील स्थायी समितीने मान्यता दिली होती. समितीच्या बुधवारी (दि.25) झालेल्या सभेत चर्होली येथील स्मशानभूमीसाठी खासगी सल्लागार नियुक्तीस मंजुरी दिली गेली आहे.

मोठ्या कामांसाठीच आवश्यकता
राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात केवळ महत्वाच्या प्रकल्पासाठी सल्लागार नेमले जात होते. पुणे-मुंबई जुना महामार्गावरील ग्रेडसेपरेटर, रावेतचा बॉस्केट ब्रिज, नाशिक फाटा दुमजली उड्डाणपुल, मदर तेरेसा उड्डाणपुल, शिवसृष्टी, अंकुशराव लांडगे प्रेक्षागृह, घरकुल योजना आदी मोठ्या कामांसाठी सल्लागार नेमले होते.

भाजपाकडून उधळपट्टी
मात्र, सत्ताधारी भाजप उठसूठ खासगी सल्लागार नेमून पालिकेच्या पैश्यांची अनाठाई उधळपट्टी करीत आहे. स्थायी समितीच्या प्रत्येक सभेत 5 ते 10 सल्लागार नेमण्यात येत आहेत, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे पालिकेच्या अभियंत्यांना कमी करून त्यांच्या जागी खासगी सल्लागार नेमण्याचा उपरोधिक सल्ला त्यांनी आयुक्तांना दिला आहे.