150 अधिकारी, कर्मचार्यांच्या आदेशावर सही
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध विभागांमध्ये अनेक अधिकारी वर्षानूवर्ष एकाच जागेवर काम करीत आहेत. त्यामुळे आता सुट्टीवर जाण्याच्या आधी आयुक्त श्रावण हर्डीकर दीडशे अधिकारी व कर्मचार्यांच्या बदल्या केल्या आहेत. बदल्यांच्या धोरणाला पालिका प्रशासन हरताळ फासत असल्याच्या सततच्या आरोपांमुळे अखेर या बदल्या करण्यात येत आहे. तसेच, आयुक्त नसल्याने अनेक अधिकारी, कर्मचार्यांना बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामध्ये अनेक मलाईदार विभागातील अभियंत्याच्याही समावेश आहे.
महापालिकेने बदल्या संदर्भात एक धोरण ठरवून घेतले होते. त्यानुसार दरवर्षी एप्रिल, मे महिन्यात तीन वर्षात टेबल व सहा वर्षात विभागांतर्गंत बदली करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, राजकीय पदाधिकारी, नगरसेवकांचा दबावामुळे प्रशासन या बदल्यांच्या धोरणाला हरताळ फासत होते. त्यावर अनेक वेळा आरोप झाले. त्यामुळे यंदा बदल्यांबाबत ठोस भूमिका घेतल्याचे समजले आहे. आयुक्त हर्डीकर 11 मे ते 2 जून दरम्यान रजेवर आहेत. रजेवर जाण्यापूर्वी त्यांनी गुरुवारी बदल्यांच्या आदेशावर सह्या केल्या आहेत.
अनेकांचे थाबे दणाणले
या बदली झालेल्यांमध्ये स्थापत्य, बांधकाम परवाना, नगररचना, पाणीपुरवठा, ड्रेनेज अशा मलईदार विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अभियंत्यांचाही समावेश आहे. त्यात स्थापत्य बीआरटीएस, ड्रेनेज विभागातील प्रत्येकी एक कार्यकारी अभियंता, बांधकाम परवाना विभागातील दोन कार्यकारी अभियंत्यांचा समावेश आहे. तर, काही अधिकार्यांकडे रखडलेले महत्त्वाचे प्रकल्प असल्याने त्यांच्या बदल्या करणे आयुक्तांनी टाळले आहे. जवळपास दीडशे जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदलीचा आदेश तयार झाल्यानंतर नगरसेवक, पदाधिकारी, राजकीय नेते यांचा दबाव वापरून अनेकजण बदली थांबविण्याचा प्रयत्न करतात. मात्र, बदल्यांच्या आदेशावर सह्या करून आयुक्त रजेवर गेले आहेत. त्यामुळे महापालिकेतील अनेकांचे थाबे दणाणले आहेत.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेत सुमारे साडेसात हजार कर्मचारी, अधिकारी काम करतात. यापैकी अनेकजण वर्षानुवर्षे एकाच जागी अथवा विभागात आहेत. मात्र, बदल्या झाल्यास ते आपल्या परिचितांचे राजकीय वजन वापरून थेट आयुक्तांवर दबाव आणून बदली फिरवून घेतात. हे प्रकार वर्षानुवर्षे घडत आहेत. यंदा आयुक्तांनी वापरलेल्या धक्कातंत्राचा काही परिणाम होणार का, हे पाहावे लागणार आहे.