पालिकेत तक्रार अर्जांचा पाऊस

0

फैजपूर । नगरपरिषदेची निवडणूक संपताच निवडणुकीतील उणेदुणे काढण्यासाठी येथील नगरपरिषद कार्यालयात गंभीर स्वरुपाच्या तक्रारी अर्जांचा दररोज अक्षरशः पाऊस पडत असून या अर्जांच्या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुवर्णा ओगले-शिंदे यांचा कस लागणार आहे. शहरात बिनबोभाट अनेक ठिकाणी झालेले अतिक्रमण, अवैध नळ कनेक्शन, नगरपरिषदेच्या मालकीच्या दुकानांवर ताबा, ओपन स्पेसमधील अवैध बांधकाम आदींबाबत सबळ पुराव्यासोबत तक्रारदारांनी अर्ज दाखल केल्याने अनेकांच्या छातीत धडकी भरली आहे. यात फारुक खान रशिद खान (रा. मन्यार मोहल्ला) यांनी मुख्याधिकार्‍यांना दिलेल्या अर्जात गट नं. 529 मध्ये प्ले ग्राऊंडसाठी आरक्षित जागेवर विनापरवानगी बांधलेले घर पाडण्याबाबत तसेच दुसरा अर्ज सुभाष चौक बाहेरपेठ भागातील सब्जी मंडीला लागून असलेला सि.स.नंं. 3808/1 या जागेवर अनधिकृतपणे कब्जा करुन व्यवसाय करीत असल्याने या दुकानाची चौकशी करुन बुडविलेला कर वसूल करुन दुकानांचा लिलाव करण्यात यावा, अशी मागणी केलेली आहे.

अतिक्रमण 10 दिवसांच्या आत हटविण्याची मागणी
हाजिरा मोहल्लयातील रहिवासी मोहंमद शफी अब्दुल मुनाफ यांनी गट नं. 639 मधील पार्किंगसाठी आरक्षित जागेवर विनापरवानगी आफताब ऑटो पार्टचे दुकान सुरु करण्यात आले असून याच ठिकाणी अवैध नळकनेक्शन घेतले असल्याने संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. शेख आरीफ शेख उस्मान (रा. इस्मालपुरा) यांनी 27 रोजी दिलेल्या अर्जात आरक्षण क्र. 33 मधील वीर सावरकर संकुलातील गाळा क्रमांक 23 समोर सुलतान चायनिज हे दुकान नगरपरिषदेच्या जागेवर अतिक्रमण करुन चालवित आहे. यात हॉटेल परवान्यासह नगरपरिषदेचे अधिकारी हप्ते घेत असल्याचा गंभीर आरोप करुन हे अतिक्रमण 10 दिवसांच्या आत हटविण्याची मागणी केली आहे. अन्यथा न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशारा दिला आहेे.

न्यायालयात तक्रार
शेख युसुफ शेख सत्तार यांनी म्युनिसिपल हायस्कूल गेटजवळील शेख कलीम शेख सलीम यांच्या नावावरील गाळे पत्रीशेडचे बांधकाम कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधून त्याठिकाणी राजेश इलेक्ट्रीकल नावाने दुकान सुरु झाले आहे. या गाळ्याचे बांधकाम त्वरीत पाडण्यात यावे, अशी मागणी केली आहे. त्याचप्रमाणे नगरसेवक कलिम मन्यार यांना चार अपत्ये असल्याने अपात्र करणेबाबत अल्ताफ हुसेन अब्दुल कादर मोमीन यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या कोर्टात सादर केलेला अर्ज, नगराध्यक्ष महानंद रविंद्र टेकाम (होले) यांच्या विरोधात तडवी रफत सुलताना इस्माईल (रा. मिल्लत नगर) यांनी जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय, भुसावळ येथे केलेल्या यााचिकेमुळे नगरपरिषद वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे.

कारवाईकडे लागले लक्ष
पालिकेत शेकडो माहिती अधिकाराचे अर्ज दाखल झाले असून याअंतर्गत मिळालेल्या माहितीच्या आधारे आजी-माजी नगरसेवक, नागरिकांनी एकमेकांविरुध्द तक्रारी अर्ज दाखल केले आहे. यात तेरी भी चूप और मेरी भी चूप, अशी भूमिका आतापर्यंत केलेल्या अनधिकृत गंभीर स्वरुपाच्या बाबी तक्रारीतून उघड झाल्या आहे. या सर्व तक्रारींचा निपटारा करतांना सत्तारुढ नगराध्यक्षासह मुख्याधिकार्‍यांचा कस लागणार असून काय कारवाई होणार, याकडे नगरवासियांचे लक्ष लागले आहे.