पालिकेत मुख्याधिकार्‍यांना धक्काबुक्की

0

भुसावळ । पालिकेची पहिली सभा सोमवार 27 रोजी सकाळी 11 वाजता घेण्यात आली. यामध्ये मागील सभेचे इतिवृत्त कायम करणे हा पहिला विषय वाचनाला घेण्यात आला असता विरोधी जनाधार विकास पार्टीच्या नगरसेवकांनी हा विषय संपुर्ण वाचनाला घ्यावा अशी मागणी केली. मात्र नगराध्यक्ष रमण भोळे यांनी वाचनासाठी रजिस्टर दिले जाईल अगोदर विषयाला मंजुरी द्यावी असे आवाहन केले. परंतु विरोधी नगरसेवकांनी काही एक ऐकून न घेता मुख्याधिकार्‍यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करुन सभागृहात गोंधळ घातला अशा गोंधळात चर्चा होणे शक्य नसल्यामुळे 1 ते 121 अशा सर्व विषयांना आवाजी बहुमताने मंजुरी देण्यात आली. यावर विरोधक अधिकच चिडून मुख्याधिकार्‍यांकडे धाव घेतली व त्यांचा हात पकडून बाहेर ओढण्याचा प्रयत्न करीत धक्काबुक्की करण्यात आली.इतक्यात नगराध्यक्ष भोळेंसह सत्ताधारी नगरसेवकांनी मुख्याधिकार्‍यांना सुरक्षितपणे नगराध्यक्षांच्या दालनात हलविले. या प्रकारानंतर विरोधकांनी मात्र जिल्हाधिकार्‍यांकडे जाण्याचा निर्णय घेतला.

मुख्याधिकार्‍यांविरोधात घोषणाबाजी
यावेळी स्विकृत नगरसेवक प्रा. सुनिल नेवे यांनी मांडलेल्या सुचनेनुसार आदरांजली व नगरसेविका धाडे यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांचा अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला. इतक्यातच विरोधी नगरसेवकांनी हातात फलक व डोक्यावर गांधी टोपी घालून मुख्याधिकार्‍यांविरोधात जनाधारचे गटनेता उल्हास पगारेे, नगरसेवक रविंद्र सपकाळे, संतोष चौधरी(दाढी), पुष्पा सोनवणे, दुर्गेश ठाकूर यांनी जोरदार घोषणाबाजी करीत सभागृहात प्रवेश केला. यावेळी पालिकेने 10 टक्के करवाढ लागू केल्याचा त्यांनी निषेध केला. यामुळे सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावर नगराध्यक्ष रमण भोळे यांनी जो काही विरेाध असेल तो लेखी स्वरुपात नोंदविण्याचे आवाहन केले. तरी देखील विरोधकांनी शांतता न राखता प्रोसिडींगची मागणी करीत आक्रमक झाले त्यामुळे गोंधळातच संपुर्ण 121 विषयांना आवाजी बहुमताने मंजूरी देण्यात आली. यामुळे विरोधकांचा संताप अधिक वाढल्यामुळे त्यांनी मुख्याधिकारी बी. टी. बाविस्कर यांचा हात धरुन ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र नगराध्यक्ष रमण भोळे व सत्ताधारी नगरसेवकांनी मुख्याधिकार्‍यांभोवती कडे करुन त्यांना सुरक्षितपणे नगराध्यक्षांच्या दालनात हलविले.

शहरातील सर्व प्रभागातील कामांचा समावेश
सत्तांतरानंतर पालिकेची पहिली सर्वसाधारण सभा घेण्यात आली. पहिलीच सभा असल्यामुळे शहरातील रखडलेल्या विकासकामांना गती देण्याच्या दृष्टीने सर्व 24 प्रभागातील विकास कामांसंदर्भात यात विषय घेण्यात आले होते. त्यादृष्टीने नियोजित वेळेनुसार सकाळी 11 वाजता सभेचे कोरम पुर्ण झाल्यामुळे ती सुरु करण्यात आली.

विरोधकांनी दिले निवेदन
यानंतर विरोधी नगरसेवकांनी रिकाम्या खुर्च्यांसमोर ठाण मांडून मुख्याधिकारी चलेजावच्या घोषणा दिल्या तसेच सत्ताधार्‍यांना सत्तेचा माज आला असून मुख्याधिकारी देखील विरोधकांचे काही ऐकून घेत नाही त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांकडे जाऊन आपले निवेदन देण्याचा निर्णय घेतला.

शिवीगाळ प्रकरणी अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
गदारोळानंतर जनाधार पार्टीच्या नगरसेवकांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेऊन नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी व मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असल्याची माहिती जगन सोनवणे यांनी दिली. सोनवणे यांनी सांगितले की, नगरसेवक रविंद्र सपकाळे, साधना भालेराव व पुष्पा सोनवणे यांनी आपल्या वेगवेगळ्या विषयासंदर्भात मागणी केली असता नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकार्‍यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार बाजारपेठ पोलीस स्थानकात दिली असल्याचे सांगितले. तसेच आमच्या तक्रारीनुसार गुन्हे दाखल न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सोनवणे यांनी दिला आहे. तर तसेच 119 क्रमांकाच्या विषयात मोठा गैरव्यवहार होण्याची शक्यता असल्याचे सचिन चौधरी यांनी सांगितले.

पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विषयांचे वाचन न करता ते मंजूर करण्यात आले. आमचा विकास कामांना कुठलाही विरेाध नाही, मुख्याधिकारी बाविस्कर एकतर्फी निर्णय घेत असून त्यांना हाकलून लावावे. सत्ताधारी नगरसेवकच मुख्याधिकार्‍यांचा हात धरुन ओढत घेऊन गेले. जिल्हाधिकार्‍यांकडे जाऊन आपले म्हणणे सादर करणार.
– उल्हास पगारे, विरोधी गटनेता

पालिकेची सभा वेळेवर सुरु झाली. यावेळी काही नगरसेवकांनी गोंधळ करीत सभागृहात प्रवेश केला. तेव्हा सह्या करुनच सभागृहात बोलण्याचा किंवा कामकामाज सहभागी होण्याचा अधिकार असल्याने त्यांना सह्या करण्यास सांगितले. यात पहिला विषय मागील इतिवृत्त कायम करणे वाचन करण्यास विरोधकांनी मागणी केली. पुष्पा सोनवणे, रवि सपकाळे, उल्हास पगारे, संतोष चौधरी (दाढी)यांनी माझ्या खुर्चीकडे धाव घेऊन संपुर्ण विषयाचे वाचन करा म्हणत गोंधळ घातला नंतर पगारे व चौधरी यांनी माझा हात पकडून मला धक्काबुक्की मला यांच्याबद्दल भिती असून त्यांच्याविरोधात तक्रार देऊन त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी प्रस्ताव पाठविणार.
– बी.टी. बाविस्कर, मुख्याधिकारी

शहराच्या इतिहासात घडली नाही अशी हि सभा होती. यामध्ये संपुर्ण 24 प्रभागांमधील विकासकामांचे विषय नमूद होते. मात्र या विषयांना मंजूरी मिळू नये याकरीता विरोधकांनी गोंधळ घातला. पालिकेच्या सभेत गदारोळ करुन मुख्याधिकार्‍यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहे. 2006 मध्ये सुध्दा पहिल्या सभेत अशाच प्रकारे यांनी दंगा घडवून शहराला वेठीस धरले होते. आज तशाच प्रकारचा प्रयत्न करण्यात आला आहे. विकास कामांमध्ये अडथळा आणण्यासाठी गोंधळ घालण्यात आला मात्र त्यांच्या जनहितासाठी सर्व 121 विषयांना मंजुरी देण्यात आली आहे. स्वत:चे स्वार्थाचे विषय होऊ न देण्यासाठी मला व मुख्याधिकार्‍यांना नोटीस देऊन वारंवार अडथळे निर्माण केले
जात आहे.
– रमण भोळे, नगराध्यक्ष