पालिकेत 57 जणांची नोकरी कायम!

0

फुरसुंगी कचराडेपो बाधित तरुणांना कायमस्वरुपी नोकरीच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी

उरुळी देवाची । फुरसुंगी येथील कचराडेपो प्रकल्पग्रस्तांच्या 57 तरुणांना महापालिकेच्या नोकरीत कायम करण्यासंदर्भातील प्रस्तावाला बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यानुसार 57 कर्मचार्‍यांना कायमस्वरुपी महापालिकेच्या सेवेत घेण्यात आले आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.

पुणे शहराच्या कचरा डेपोसाठी उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील शेतकर्‍यांच्या तब्बल 153 एकर जागा महापालिकेतर्फे संपादित केली होती. मात्र, या कचरा डेपोमुळे परिसरातील जलस्रोत आणि जमीन प्रदूषित झाल्यामुळे दोन्ही गावांच्या ग्रामस्थांनी 2009पासून ‘कचरा डेपो हटाव’ आंदोलन सुरू केले. परिसरातील कचरा डेपो स्थलांतरासोबतच प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना महापालिकेच्या नोकरीत कायम करण्याची प्रमुख मागणी केली होती. त्यानंतर महापालिकेने प्रकल्पग्रस्तांच्या 62 तरुणांना 2011पासून बिगारी म्हणून सहा महिन्यांसाठी पालिकेच्या सेवेत घेतले. त्यानंतर प्रकल्पग्रस्तांच्या तरुणांना पालिकेत कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेण्याबाबतचा प्रस्ताव महापालिकेने शासनाकडे पाठविला होता.

एका पात्र वारसास नोकरी
राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये पुण्यातील उरुळी-फुरसुंगी कचरा डेपोसाठी जमीन दिलेल्या कुटुंबीयांच्या एका पात्र वारसास पुणे महानगरपालिकेतील रिक्त पदावर नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. पुणे शहरातील कचरा फुरसुंगी गावात टाकण्यात येतो. या गावातील नागरिकांच्या जमिनीवर हा कचरा टाकल्याने, त्या जमिनीचा काहीच वापर होत नाही. त्यामुळे अशा प्रकल्पबाधितांना सरकारने पुणे महापालिकेत तात्पुरत्या स्वरुपाच्या नोकर्‍या दिल्या होत्या. त्यांना आता कायमस्वरुपी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यावर शासनाने निर्णय घेतला नव्हता. तीन महिन्यांपूर्वी ग्रामस्थांनी पुन्हा पुणेकरांची कचराकोंडी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला होता. तेव्हा प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना कायम सेवेत सामावून घेण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने सुधारित प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता. त्याला मंजुरी देण्यात आल्याची माहिती गिरीश बापट यांनी दिली.

काय आहे कचराडेपोचा प्रश्‍न
शहरातील कचरा फुरसुंगी-उरुळी या गावाजवळच्या कचराडेपोत टाकला जातो. काही दिवसांपूर्वी फुरसुंगीच्या कचरा डेपोला आग लागली होती. ही आग अनेक दिवस धुमसत असल्याने फुरसुंगीकरांना जगणं मुश्कील झाले होते. त्यामुळे फुरसुंगीकरांनी पुणे शहरातील कचरा टाकण्यास जोरदार विरोध केला होता. इतकंच नाही तर कचर्‍याचा प्रश्‍न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी आंदोलनही सुरू होती. 14 एप्रिलपासून फुरसुंगीकरांनी आंदोलन सुरू केले होते. 23 दिवस हे आंदोलन सुरू होते.

महापौर मुक्ता टिळक यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन चर्चा केली, मात्र गावकरी आपल्या भूमिकेवर ठाम होते. पुणे शहरातून दिवसाला जवळपास 1700 मेट्रीक टन कचरा उचलला जातो. यांपैकी जवळपास 500 टन कचर्‍यावर प्रक्रिया होते. राहिलेला कचरा डंपिंग ग्राउंंडवर फेकला जातो.