पालिकेने एक हेक्टर जागाही ताब्यात घेतलेली नाही : आ. मेधा कुलकर्णी

0

कोथरूड । चांदणी चौकातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी तब्बल 450 कोटी खर्च करून बहुमजली उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रस्तावित उड्डाणपुलाचे भूमीपूजन होऊन अडीच महिने झाले, तरी अजून एक हेक्टर जागाही महापालिकेने ताब्यात घेतलेली नाही. या उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा आमदार मेधा कुलकर्णी यांनी नुकताच घेतला.

यावेळी महापालिका, राष्ट्रीय महामार्ग विभागासह संबंधित विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत उड्डाणपुलाच्या वस्तुस्थितीबाबत माहिती घेतली. यावेळी स्थानिक नगरसेवक श्रद्धा प्रभुणे-पाठक, अपर्णा वर्पे, दिलीप वेडे, किरण दगडे, जयंत भावे, प्रकल्प निर्देशक सुहास चिटणीस, प्रकल्प सल्लागार मिलिंद वाबळे, आशिष दुबे, तायडे, मालमत्ता व्यवस्थापन उपायुक्त सतीश कुलकर्णी, उपायुक्त श्रीनिवास बोनाला, राजाभाऊ जोरी, उदय कड, रितेश वैद्य आदी उपस्थित होते.

एनएचआयएच्या टेंडर प्रक्रियेला स्थगिती
चांदणी चौकातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी बहुमजली उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 27 ऑगस्ट 2017 रोजी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्याचे भूमीपूजन झाले. त्याला अडीच महिने झाले, तरी कामाला काही गती मिळाली नाही. साधी एक हेक्टर जागाही महापालिकेला ताब्यात घेता आली नाही. त्यामुळे एनएचआयए मार्फत राबविण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेला स्थगिती द्यावी लागली आहे. उड्डाणपुलाच्या प्रस्तावित वस्तुस्थितीचा आढावा घेण्यासाठी आ. कुलकर्णी यांनी संबधित अधिकार्‍यांच्या उपस्थित पाहणी केली. या प्रकल्पामध्ये श्रुंगेरी मठ रस्ता परिसरातील 88 तर वेदभवन रस्ता परिसरातील 3 इमारती आणि एक बंगला बाधित होते.

पुनर्वसनासाठी अंदाजे 100 कोटी
या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी अंदाजे 100 कोटी रोख लागणार आहेत. ही रक्कम वर्गीकरणाद्वारे उपलब्ध होऊ शकते. ती उपलब्ध होणे संदर्भात आयुक्तांशी चर्चा करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे आवाहन आ. कुलकर्णी यांनी केले. तसेच एकूण ताब्यात घ्यावी लागणार्‍या 15 हेक्टर जागेपैकी 7 हेक्टर जागा ही बीडीपी झोनमध्ये येत असून त्यासंबंधी निर्णय राज्य शासनाकडे प्रलंबित आहे. ही बीडीपीमधील जागा प्रकल्पासाठी ताब्यात देण्यासंबंधीचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिले आहे. या जागेच्या कॉम्पेनसेशन संदर्भात धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. ही बाब राज्य शासनाच्या निदर्शासानास आणून दिल्याचे आमदार कुलकर्णी यांनी सांगितले.