नवी मुंबई । ऑक्टोबर महिन्यात भारतात रंगणार्या 17 वर्षांखालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी नेरुळ सेक्टर 19 येथे असलेले नवी मुंबई महापलिकेचे यशवंतराव चव्हाण मैदान सज्ज होत आहे. पालिकेचे मैदान म्हटल्यावर आपल्या नजरेसमोर येते ते दुर्लक्षित झालेले, गेट तुटलेले, खड्डे पडलेले असे एक ना अनेक दुरावस्थांच्या कात्रीत सापडलेले हे मैदान फिफा विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने नशीबवान ठरले आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेतील काही सामने डॉ डी वाय पाटील मैदानावर होणार आहेत. या मैदानावर खेळणार्या संघांना सराव करण्यासाठी नवी मुंबईतील दोन मैदानांची निवड करण्यात आली आहे. त्यातील एक वाशी येथील नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनचे मैदान व दुसरे नेरुळ सेक्टर 19 येथील यशवंतराव चव्हाण मैदान आहे. या मैदानाला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधांनी युक्त असे अद्ययावत केले जात आहे. स्थानिक खेळांसाठी ठेवलेल्या या मैदानावर आता आंतरराष्ट्रीय नियमानुसार फुटबॉल मैदान आकार घेत आहे.
वाळू वापरण्याची सूचना
संपूर्ण क्रीडांगणावर अद्ययावत गवत उगवण्यात येत आह हे गवत ( बर्म्युडा ग्रास) दिल्लीवरून आणण्यात येणार आहे, तर त्याआधी यावर जराही मातीचा वापर न करता फक्त वाळू आणि खडीचा वापर करण्यात येत आहे. मैदानासाठी केवळ नदीतील वाळू वापरण्याची ताकीद फिफाच्या पदाधिकार्यांनी दिली आहे. पावसाळ्यानंतर होणार्या या स्पर्धे साठी हे मैदान भारतातला पावसाळा नजरेसमोर ठेवूनच तयार केले जात आहे. यासाठी मैदानात साचणार्या पाण्याचा निचरा करणारी अद्यावयत यंत्रणा उभारली जात आहे. त्यामुळे कितीही मोठा पाऊस आला तरी काही मिनिटांत यया मैदानावरचे पाणी शोषून घेतले जाईल व मैदान सरावासाठी उपलब्ध होऊ शकेल.