मुंबई । देवनार येथील नाल्यावर झालेल्या अनधिकृत बांधकामांची पालिकेला तब्बल सात वर्षांनंतर जाग आली. वाहतुकीला अडथळा ठरत असल्याचे सांगत पालिकेने गुरुवारी 20 बांधकामांवर कारवाई केली. या कारवाईमुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे. देवनार नाल्यावरील पाचनळ पुलाच्या शेजारी अनधिकृत बांधकामे झाली होती. अतिक्रमणांमुळे पाचनळ पुलाचे रुंदीकरण रखडले होते. परिणामी वाहतूक कोंडीचा फटका मागील 7 वर्षांपासून नागरिकांना बसत होता. अडथळा ठरणारी बांधकामे तोडण्यात यावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात आली होती.
पुलाच्या रुंदीकरणाचा मार्गही झाला मोकळा
पालिकेने या मागणीची दखल घेत, गुरुवारी पुलाशेजारील 20 बांधकामे तोडल्याने पुलांच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे तसेच परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यासदेखील मदत होणार आहे. महापालिकेच्या परिमंडळ – 5 चे उपायुक्त भारत मराठे यांच्या मार्गदर्शनानुसार कारवाई केल्याची माहिती एम/पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास किलजे यांनी दिली. कारवाईसाठी 3 जेसीबी, 1 डंपर यासह इतर आवश्यक वाहने व साधनसामग्री वापरण्यात आली. दरम्यान, 31 कामगार, कर्मचारी आणि अधिकारी, देवनार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे यांच्यासह 50 पोलिसांचा सहभाग होता, असे किलजे यांनी सांगितले.
भायखळा येथे अनधिकृत बांधकामावर कारवाई
कमला मिल आग प्रकरणानंतर मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामावर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.
गुरुवारी भायखळा ई विभागातील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. सहाय्यक आयुक्त ई विभाग व उपायुक्त (परि.-1) यांच्या मार्गदर्शनाखाली ई विभागात अनधिकृत बांधकामे व उघड्यावरील खाद्यपदार्थांवर कारवाई करण्यात आली. त्यात सहाय्यक अभियंता (परि.) नागपाडा पोलीस ठाणे येथील पोलिसांच्या मदतीने ई विभागातील शंकर फुपाला मार्ग व परशुराम फुपाला मार्ग येथे केलेल्या निष्कसनाच्या कारवाईत पदपथावरील 11 स्टॉल, 41 शेड्स 15 ओटले इ. बांधकामे यांच्यावर कारवाई करण्यात आली तसेच 1 फ्रिज, 1 शेगडी, 2 लाकड़ी बाकड़े, 20 किलो अन्नपदार्थ, 1 डीझेल भट्टी जप्त करण्यात आले.