या वर्षाअखेरीस पालिका उत्पन्नात केवळ 4 हजार 200 कोटींचाच टप्पा गाठणार
उत्पन्न वाढविण्यासाठी विशेष मोहिमा राबविण्याचे आयुक्तांचे आदेश
पुणे : पुणे महापालिकेस या आर्थिक वर्षात उत्पन्नाचा मेळ बसवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. पालिकेला वर्षाअखेरीस उत्पन्नात केवळ 4 हजार 200 कोटींचाच टप्पा गाठता येणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे सर्व विभागांनी तातडीने पुढील काही महिन्यांत आपल्या विभागाचे उत्पन्न वाढविण्यासाठी विशेष मोहिमा राबविण्याचे आदेश आयुक्तांनी दिले असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी स्पष्ट केले आहे. बांधकाम विभाग आणि मिळकतकर विभागाने विशेष मोहिमा राबवून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना देत जमा उत्पन्नावरून आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेला मिळणारे जीएसटीचे अनुदान शासनाने अपेक्षेप्रमाणे न वाढविल्याने वर्षाअखेरीस या विभागाचे उत्पन्न जास्तीत जास्त 1,700 कोटींपर्यंत जाणार असल्याचे सांगितले आहे.
अंदाजपत्रक सुमारे 5,870 कोटींचे
महापालिकेच्या 2018-19चे अंदाजपत्रक सुमारे 5,870 कोटी रुपयांचे आहे. मात्र, वर्षाअखेरीस हे उत्पन्न 4,200 कोटी रुपयांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना आयुक्त सौरभ राव यांनी विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत दिल्या आहेत.
2,500 कोटी रुपयांचे उत्पन्न जमा
तत्कालिन आयुक्त कुणाल कुमार यांनी 2018-19चे सुमारे 5 हजार 397 कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यात सुमारे 473 कोटींची वाढ करत स्थायी समितीने आपले अंदाजपत्रक सादर केले आहे. महापालिकेस जमा बाजूचे उद्दिष्टजवळपास 5 हजार 870 कोटी रुपयांचे आहे. मात्र, यावर्षी 1एप्रिल ते ऑक्टोबर अखेरपर्यंत म्हणजेच गेल्या सात महिन्यांमध्येपालिकेच्या तिजोरीत सुमारे 2,400 ते 2,500 कोटी रुपयांचे उत्पन्न जमा झालेले आहे.
अवघे 45 टक्केच उत्पन्न प्राप्त
यात बांधकाम विभागाचे 400कोटी, मिळकतकर विभागाचे 800 कोटी तर जीएसटी अनुदानाच्या 1,100 कोटींसह, इतर विभागांच्या उत्पन्नाच्या समावेश आहे. तर अंदाजपत्रकात बांधकाम विभागास 702 कोटी, जीएसटी विभागास 2 हजार कोटी मिळकतकर विभागास 1,600 कोटी तर इतर विभागांना जवळपास 700 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे आकडे पाहता पालिकेस पहिल्या सात महिन्यांत अवघे 45 टक्केच उत्पन्न प्राप्त झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन आयुक्तांनी सर्व संबंधित विभागांना उत्पन्नवाढीच्या सूचना केल्या आहेत. त्यात बांधकाम विभागाने आपले उद्दिष्ट पूर्ण होणार असल्याचे सांगितले असून मिळकतकर विभागाने वसुली मोहीम जास्तीत जास्त तीव्र करूनही आणखी 300 ते 400 कोटींचे उत्पन्न मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
पुढील काही महिन्यात
महापालिकेला मिळणारे जीएसटीचे अनुदान शासनाने अपेक्षेप्रमाणे न वाढविल्याने या विभागाचे उत्पन्नही वर्षाअखेरीस जास्तीत जास्त 1,700 कोटींपर्यंत जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पालिकेस वर्षाअखेरीस केवळ 4 हजार 200 कोटींचाच टप्पा गाठता येणार असल्याचे निश्चित आहे. त्यामुळे सर्व विभागांनी तातडीने पुढील काही महिन्यात आपल्या विभागाचे उत्पन्न वाढविण्यासाठी विशेष मोहिमा राबविण्याचे आदेश आयुक्तांनी दिले असल्याचे सांगण्यात येत आहे.