कर्मचार्यांना सातव्या वेतन आयोग लागू
पुणे : राज्य शासनाने शासकीय कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास मंजूरी दिली आहे. हा वेतन आयोग महापालिका कर्मचार्यांनाही लवकरच लागू केला जाणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या अंदाजपत्रकावर 2019-20 साठी सुमारे 300 कोटी रुपयांच्या वाढीव खर्चाचा भार येणार असल्याची प्राथमिक माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. सद्या वेतनासाठी अंदाजपत्रकात 1500 कोटींचा खर्च येतो, यामुळे या खर्चात आता 1800 कोटींपर्यंत वाढ होणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
महापालिकेत सुमारे 18 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना दरमहा वेतनासाठी महापालिकेस मुळवेतन, इतर भत्ते तसेच पेन्शनसाठी महिन्याला सुमारे 125 कोटींचा खर्च येतो. शासनाने लागू केलेला हा सातवा वेतन आयोग 2016 पासून लागू केला जाणार आहे. त्यामुळे महापालिकेकडून मुळ वेतनासह, मागील तीन वर्षांच्या वेतनाचा फरकही दिला जाणार आहे. हा फरक पाच समान हप्त्यात दिला जाणार असला तरी, मुळ वेतनातील वाढ महापालिकेने आयोग लागू करताच दिली जाणार आहे.