शिरपूर । प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे झाले असून स्वतःसह कुटुंबाच्या चांगल्या उत्तम आरोग्यासाठी प्रयत्नशील असावे. आपल्या जीवनात आई-वडील यांचे खूपच महत्त्व असल्याने त्यांच्यासह वडीलधारी मंडळी यांचा सन्मान राखून त्यांची सेवा करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांनी केले. भोईटी येथे आर.सी. पटेल मेडीकल फाऊंडेशनच्यावतीने शुक्रवार, 6 रोजी मोफत मोतिबिंदू, नेत्र तपासणी, नेत्र शस्त्रक्रिया, आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते.
रुग्णसेवेतून खरा आनंद
पुढे बोलतांना श्री. पटेल म्हणाले की, रुग्ण सेवेतून खरा आनंद मिळत असल्याने गरजू व सर्वानीच आरोग्य शिबिराचा लाभ घेवून समाज सेवेत देखील योगदान द्यावे. सर्वांसाठी चांगले शिक्षण, शेतीसाठी व पिण्यासाठी मुबलक पाण्याची उपलब्धता, उत्तम आरोग्य मिळावे यादृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न आहेतच. आ. अमरिशभाई पटेल यांनी गेल्या 32 वर्षांच्या कालावधीत जनतेच्या सेवेसाठी खूप काही केले. सर्वांचे जीवनमान उंचावण्यासाठी यशस्वी प्रयत्न सुरु आहेत. विकास योजना आपल्या दारी या आपण खाजगीरित्या सुरु केलेल्या अभियानातून प्रत्येक गावात विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिले जात आहेत. असे ही ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमादरम्यान, आ. काशिराम पावरा यांनीही मनोगत व्यक्त केले.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास आ. काशिराम पावरा, गुजराथ शंकरा आय हॉस्पीटलचे डॉ. अजय ठाकूर, डॉ. राजन मुक्तान, शिरपूर मर्चंट बँकेचे चेअरमन प्रसन्न जैन, जि.प. सदस्य प्रेमसिंग बंजारा, पं.स. उपसभापती संजय पाटील, श्री बालाजी संस्थानचे उपाध्यक्ष गोपाल भंडारी, माजी पं.स. सदस्य गयास खाटीक, भोईटीचे सरपंच दीपक पावरा, उपसरपंच रविंद्र कोळी, संतोष परदेशी, जाकीर शेख, मर्चंट बँक संचालक नवनीत राखेचा, साखर कारखाना संचालक जयवंत पाडवी, आंबे येथील सरपंच कृष्णा पावरा, प्रियदर्शिनी ऑफसेटचे व्हाईस चेअरमन राजेश भंडारी, अविनाश शाह, पिपल्स बँकेचे संचालक संजय चौधरी, रमेश भील, रघुनाथ पावरा, प्रदीप पाटील, भीमराव पाटील, राजाराम पावरा, बी.डी. शिरसाठ, किशोर माळी, दगडू चौधरी, भैरव राजपूत, महेश पाठक, सचिन चौधरी, नईम इनामदार, संदिप शिरसाठ, रोहित माळी, निलेश वाघ, विशाल पाटील, अनिल सोनवणे, राजू पाटील, प्रेमसिंग गिरासे आदी उपस्थित होते.
85 जणांवर होणार शस्त्रक्रिया
आर.सी. पटेल मेडीकल फाऊंडेेशन व शंकरा आय हॉस्पीटल, गुजरात यांच्या सहकार्याने सुळे येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत मोतिबिंदू, नेत्र तपासणी, नेत्र शस्त्रक्रिया, आरोग्य शिबिरात 225 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यातील 85 जणांवर नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.